न्यायालयीन अडथळे दूर; विजापूर रोड व सर्व्हिस रोडवरील अतिक्रमणांवरही कारवाईचे संकेत
सोलापूर ; शहरातील बेकायदा बांधकामांविरोधात सोलापूर महानगरपालिकेने सुरू केलेली कारवाई पुन्हा गती घेणार असून बुधवारपासून ही मोहीम नव्याने राबविण्यात येणार आहे. न्यायालयीन प्रक्रियेतील अडथळे दूर झाल्याने प्रशासनाने निर्णायक पाऊल उचलण्याची तयारी सुरू केली आहे.
महापालिकेच्या माहितीनुसार शहरातील सुमारे 96 बेकायदा बांधकामांवर टप्प्याटप्प्याने कारवाईचे नियोजन करण्यात आले आहे. यापूर्वी काही बांधकामांवर कारवाई करण्यात आल्यानंतर संबंधितांनी न्यायालयात धाव घेतल्याने मोहिमेला तात्पुरती स्थगिती मिळाली होती. मात्र न्यायालयाने संबंधितांचा दावा फेटाळल्याने महापालिकेचा मार्ग मोकळा झाल्याचे चित्र आहे. परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी मंगळवारी रात्री बांधकाम विभागाचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीत प्रलंबित कारवाया आणि पुढील नियोजनावर सखोल चर्चा करण्यात आली. विशेषतः विजापूर रोड आणि सैफुल रोडवरील सर्व्हिस रोडवरील अतिक्रमणांचा मुद्दा प्राधान्याने मांडण्यात आला.


या भागातील अतिक्रमणे हटविल्यास वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असा प्रशासनाचा अंदाज आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सर्वेक्षण व अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, मोहीम पुन्हा सुरू होणार असल्याने बेकायदा बांधकाम धारकांमध्ये पुन्हा खळबळ निर्माण झाली आहे. कारवाईदरम्यान कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस बंदोबस्ताची मागणीही महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून करण्यात आली आहे.
टप्प्याटप्प्याने शहरातील सर्व बेकायदा बांधकामांवर कारवाई करून अतिक्रमणमुक्त शहराच्या दिशेने पुढील पावले उचलली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.












