ऊसबिलासाठी शेतकऱ्यांचा एल्गार; सोलापूर–धाराशिवातील ऊस उत्पादक आक्रमक, रस्त्यावरच चूल पेटवून आंदोलन
सोलापूर ; दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ साखर कारखान्याकडे तब्बल १३० कोटी रुपयांची ऊसबिलाची थकबाकी असल्याचा आरोप करत सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. थकीत रक्कम तातडीने मिळावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू केले आहे.
“जोपर्यंत ऊसबिलाची रक्कम खात्यात जमा होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही,” अशी ठाम भूमिका आंदोलक शेतकऱ्यांनी घेतली आहे. आंदोलनस्थळीच चूल पेटवून डाळ-भात शिजवत शेतकरी ठिय्या आंदोलन करत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून आंदोलनकर्ते रस्त्यावरच राहून आपला संघर्ष सुरू ठेवत आहेत.


शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून संबंधित साखर कारखान्यावर जप्तीचे आदेश काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे आंदोलक शेतकरी अमोल पाटील यांनी स्पष्ट केले. या आंदोलनात अरविंद घोडके, अंबादास शिवशंकर, सचिन जवळगे, प्रशांत सुरवसे, गणेश नरे यांच्यासह सुमारे तीस गावांतील शेतकरी सहभागी झाले आहेत.











