सोलापूर ; दक्षिण आफ्रिकेच्या डर्बनमध्ये झालेल्या अतिशय खडतर अशा अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये स्पर्धेत सोलापूरच्या दोन पोलिसांनी भारताचा तिरंगा फडकावला. पोलिस निरीक्षक दत्तात्रय काळे आणि पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांचे अंगरक्षक असलेले हेमंत वाघमारे यांनी महाराष्ट्र पोलिसांत प्रथम येण्याचा मान मिळवला. ही स्पर्धा जगातील सर्वाधिक खडतर आणि प्रतिष्ठेची मानली जाते. मोठ्या जिद्दीने या दोघांनी सोलापूरचे नाव उज्ज्वल केल्याचे आयुक्त एम. राजकुमार यांनी म्हटले आहे. वाघमारे यांनी ८५.७७७ किलोमीटर अंतराची ही अत्यंत कठीण चढाईची स्पर्धा पूर्ण केली. डर्बन ते पीटरमॅरिट्झबर्ग या मार्गावर झालेल्या या स्पर्धेत जगभरातील तब्बल २१ हजार ६७८ धावपटूंनी सहभाग घेतला होता.

राष्ट्रगीतानंतर पहाटे पाच वाजता सुरू झालेल्या स्पर्धेत काळे यांनी १० तास २३ मिनिटांत तर हेमंत वाघमारे यांनी अवघ्या ९ तास २९ मिनिटांत अंतर पूर्ण केले. या कामगिरीने महाराष्ट्र पोलीस दलात प्रथम येण्याचा मान त्यांनी मिळवला. ‘द अल्टिमेट ह्युमन रेस’ म्हणून ओळखल्या ओळखल्या जाणाऱ्या कॉमरेड्स अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये अनेक कट-ऑफ पॉइंट्स असतात. निर्धारित वेळेत ते गाठण्यात अपयशी ठरल्यास स्पर्धक बाद होतो. त्यामुळे ही स्पर्धा मानसिक ताकद आणि जिद्दीची खरी कसोटी मानली जाते. हुडहुडी भरणारी थंडी, उष्णता, जीवघेणे चढ उतार या आव्हानांवर मात करत दोन्ही धावपटूंनी स्पर्धा पूर्ण केली. अंतिम ४०० मीटरमध्ये हजारो प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने अविस्मरणीय अनुभव मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. अंतिम रेषा पार करत तिरंगा फडकावत भारताचा गौरव जगासमोर मांडण्याचा अभिमानास्पद क्षण त्यांनी अनुभवला.

खडतर स्पर्धेमध्ये आत्मविश्वासाने चढाई
जगातील सर्वात जुनी स्पर्धा आहे. यंदाचे ९९ वर्ष होत. जगातील १८ मॅरेथानपैकी ही सर्वात खडतर स्पर्धा आहे. तेथे मोठ्या टेकड्या आहेत त्या टेकड्या ठराविक वेळेत पोहोचून पार करावे लागते. अन्यथा स्पर्धेतून बाद केला जातो. ही स्पर्धा पार करण्यासाठी मागील सात ते आठ महिन्यापासून तयारी करत होतो. १०.२३ तासांत पार केली. त्यासाठी पोलिस आयुक्त राजकुमार यांनी मला आत्मविश्वास दिला.”
दत्तात्रय काळे, पोलिस











