अग्निशमन दलाच्या ४ गाड्या, १५ कर्मचारी तैनात
सोलापूर : तुळजापूर रोडवरील कचरा डेपोतील दोन मोठ्या ढिगार्यांना काल सोमवारी लागलेली भीषण आग अग्निशमन दलाच्या युद्धपातळीवर केलेल्या प्रयत्नामुळे दुसऱ्या दिवशी आटोक्यात आली आहे. त्यानंतर कुलिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. आणखी दोन दिवस हे ऑपरेशन सुरू ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका अग्निशमन विभागाचे अधीक्षक राकेश साळुंखे यांनी दिली.तुळजापूर रोडवरील कचरा डेपोतील दोन मोठ्या ढिगार्यांना सोमवार दि. ४ मे २०२६ रोजी दुपारी दुपारी ४.२२ वाजता भीषण आग लागली होती. वाढत्या तापमानामुळे आणि अतिउष्णतेमुळे ही आग लागल्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली.


माहिती मिळताच अग्निशामक दलाचे अधीक्षक राकेश साळुंखे हे घटना स्थळी दाखल झाले होते. अग्निशमन दलाच्या ५ गाड्याच्या साह्याने आग विझवण्यासाठी युद्ध पातळीवर जवानांनी प्रयत्न केले. काल आणि आज मंगळवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६० गाड्या पाणी मारून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. अखेर ही आग आटोक्यात आणली आहे. थोड्या प्रमाणात धूर निघत आहे. अग्निशामक दलाचे अधीक्षक राकेश साळुंखे हे घटनास्थळी तळ ठोकून होते. कचरा डेपोतील आग ही सहसा लवकर विझत नाही मात्र अधीक्षक साळुंखे यांनी कार्य कुशलतेने आग जवानांच्या माध्यमातून दीड दिवसात आटोक्यात आणली.











