
सोलापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या परीक्षा सुधारणा समितीच्या सदस्यपदी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तानाजी माने यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे सोलापूर जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) अनुषंगाने इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा आणि मूल्यमापन प्रक्रियेत व्यापक बदल करण्यात येणार आहेत. या बदलांचे स्वरूप निश्चित करण्यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षा सुधारणा समितीची स्थापना केली असून, त्यावर सदस्य म्हणून तानाजी माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


शालेय शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव, मुख्याध्यापक संघटनेतील नेतृत्व आणि शैक्षणिक विषयांवरील अभ्यासपूर्ण मांडणीची दखल घेत राज्य मंडळाने ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविल्याची भावना शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे. तानाजी माने यांच्या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष मनोहर सपाटे, शालेय समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सपाटे, मुख्याध्यापक महामंडळाचे माजी अध्यक्ष सुभाष माने यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

नवीन मूल्यमापन प्रणाली अधिक परिणामकारक, विद्यार्थीकेंद्रित आणि गुणवत्तापूर्ण करण्यासाठी तानाजी माने यांचे योगदान महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षणप्रेमींनी व्यक्त केला आहे.











