सोलापूर: “संख्याबळ नसतानाही केवळ स्वतःच्या अहंकारपोटी (इगो) विरोधकांनी ही निवडणूक जिल्ह्यावर लादली आहे. पण या निवडणुकीचा निकाल पूर्णपणे एकतर्फी लागणार असून, भाजप-महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत हे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील,” असा ठाम विश्वास सोलापूर दक्षिणचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केला आहे.नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना त्यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली. आमदार कल्याणशेट्टी म्हणाले की, “या निवडणुकीत महायुतीचे सर्वच अधिकृत उमेदवार आणि निवडून आलेले सदस्य आमच्या सोबत खंबीरपणे उभे आहेत.
ही निवडणूक लागण्याची शक्यता खूप कमी होती, मात्र केवळ विरोधाला विरोध करायचा म्हणून विरोधकांनी ही निवडणूक लादली आहे. निकालाच्या दिवशी विरोधकांना त्यांची जागा नक्कीच समजेल.”अदृश्य शक्ती नाही, हर हर महादेवचा नारा सोबत!विरोधकांकडून ‘अदृश्य शक्ती’ पाठिशी असल्याचा दावा केला जात असल्याच्या प्रश्नावर बोलताना आमदार कल्याणशेट्टी यांनी टोला लगावला.
“कुठलीही अदृश्य शक्ती त्यांच्या मागे नाही. उलट त्यांची स्वतःचीच हळूहळू ‘अदृश्य’ होण्याची वेळ आली आहे, म्हणूनच त्यांना आता असे सुचत आहे. आम्ही ‘हर हर महादेव, जय श्रीराम’ हा नारा घेऊन पुढे निघालो आहोत आणि ही शक्ती आमच्या सोबत आहे. त्यामुळे आम्हाला कोणतीही काळजी नाही. निकालानंतर विरोधकांच्या या अपेक्षा पूर्णपणे फोल ठरतील,” असेही ते म्हणाले.
महायुती भक्कम, दगाफटका होणार नाही: शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे दोन्ही पक्ष महायुतीमध्ये पूर्ण ताकदीने सोबत असल्याने कुठेही दगाफटका होण्याची शक्यता नाही, असा विश्वास त्यांनी दिला. “काही लोक छुपे नसून उघडपणे आमच्या सोबत आहेत. आमची महायुती अतिशय भक्कम आहे आणि आम्ही चांगल्या बहुमताने निवडून येऊ,” असे सांगत त्यांनी निकाल एकतर्फी लागणार असल्याचे स्पष्ट केले.शेवटी बोलताना आमदार कल्याणशेट्टी म्हणाले की, “विरोधकांवर जे आरोप होत आहेत, त्यापलीकडे त्यांच्याकडे बोलण्यासारखे काही नाही. निकालाच्या दिवशी ज्या गोष्टी बोलायला पाहिजेत, त्या त्यांनी आताच बोलायला सुरुवात केली आहे. यावरूनच त्यांचा पराभव निश्चित असल्याचे स्पष्ट होत असून, राजेंद्र राऊत यांचा विजय पक्का आहे.”