सोलापूर, : शहरातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पिवळसर आणि गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः माजी सैनिक नगर, जुना विजापूर नाका आणि कुमठा नाका परिसरात तब्बल आठ दिवसांनंतर नळाला पाणी आले; मात्र तेही दूषित आणि पिवळसर स्वरूपात आल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.
- आधीच अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त असताना आता येणारे पाणीही वापरण्यायोग्य नसल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. अनेक भागांमध्ये नळातून गढूळ, मातीमिश्रित आणि पिवळसर पाणी येत असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खर्चातही वाढ झाली आहे. दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना विविध आजारांचा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शहरात अशा प्रकारचा दूषित पाणीपुरवठा होत असतानाही महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
- “आठ दिवस पाणी नाही, आणि जे आले तेही गढूळ. नागरिकांनी नेमके जगायचे कसे?” असा संतप्त सवाल स्थानिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी जलवाहिन्यांमध्ये गळती, दुरुस्तीचा अभाव आणि नियोजनशून्य कारभारामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. महापालिका प्रशासनाने संबंधित भागातील जलवाहिन्यांची तातडीने तपासणी करून गळतीची दुरुस्ती करावी तसेच नागरिकांना स्वच्छ आणि नियमित पाणीपुरवठा करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. दूषित पाणीपुरवठ्याचा प्रश्न तातडीने मार्गी न लागल्यास आंदोलनाचा इशाराही काही नागरिकांनी दिला आहे













