सोलापूर | सोलापूर शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेतील महत्त्वाच्या हिप्परगा तलाव ते भवानी पेठ जलशुद्धीकरण केंद्र या मुख्य जलवाहिनीवर दुरुस्ती, नवीन व्हॉल्व बसविणे आणि विविध जोडणीची कामे हाती घेण्यात आल्याने बुधवार, दि. १० जून रोजी पाणीपुरवठा विभागाकडून शटडाऊन घेण्यात येणार आहे. या कामांसाठी मोठा कालावधी लागणार असल्याने भवानी पेठ जलशुद्धीकरण केंद्रावर अवलंबून असलेल्या अनेक भागांतील पाणीपुरवठा प्रभावित होणार आहे. त्यामुळे भवानी पेठ, दयानंद टाकी, कस्तुरबा टाकी, दहिटणे-शेळगी जलयोजना, विडी घरकुल आणि हायलेव्हल जलटाकी परिसरातील पाणीपुरवठा एक वेळ, एक रोटेशन आणि एक दिवस उशिराने करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य अभियंता कार्यालयाने दिली.
महानगरपालिकेने नागरिकांना आवश्यक तेवढ्या पाण्याचा साठा करून ठेवण्याचे आवाहन केले असून पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची विनंती केली आहे. दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

- या भागांना बसणार फटका
- भवानी पेठ जलशुद्धीकरण केंद्र परिसर
- दयानंद टाकी
- कस्तुरबा टाकी
- दहिटणे-शेळगी जलयोजना
- विडी घरकुल
- हायलेव्हल जलटाकी परिसर











