सोलापूर | पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतरविद्यापीठ महिला कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा ‘महिला महोत्सव-२०२६’ला सोमवारी उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील पाच विद्यापीठांतील महिला कर्मचाऱ्यांनी विविध स्पर्धांमधून आपले कलागुण सादर करत उत्साह, ऊर्जा आणि सांस्कृतिक वैभवाचा अनोखा संगम अनुभवायला दिला.
१५ ते १७ जूनदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाचे उद्घाटन कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ समाजसेविका चंद्रिका चौहान यांच्या हस्ते झाले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, वित्त व लेखाधिकारी सीए महादेव खराडे, परीक्षा संचालक डॉ. श्रीकांत अंधारे, डॉ. गणेश काकंडीकर, डॉ. केदारनाथ काळवणे, डॉ. अनिल घनवट, डॉ. मुकुंद माळी आदी उपस्थित होते.

प्रारंभी प्रभारी कुलसचिव तथा क्रीडा संचालक डॉ. अतुल लकडे यांनी प्रास्ताविक करून महोत्सवाच्या उद्देशाची माहिती दिली. महिला कर्मचाऱ्यांमध्ये नेतृत्वगुण, संघभावना आणि आत्मविश्वास वृद्धिंगत करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या महोत्सवात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील महिला कर्मचारी सहभागी झाल्या आहेत.

उद्घाटनापूर्वी सहभागी महिला कर्मचाऱ्यांनी विद्यापीठ परिसरातून आकर्षक रॅली काढली. त्यानंतर वैयक्तिक गायन, वैयक्तिक नृत्य, समूह गायन आणि समूह नृत्य स्पर्धा पार पडल्या. वैयक्तिक गायन स्पर्धेत आठ स्पर्धकांनी सुमधुर सादरीकरण केले, तर वैयक्तिक नृत्य स्पर्धेत सात स्पर्धकांनी पारंपरिक व आधुनिक नृत्यशैलींचे सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली. समूह गायन आणि समूह नृत्य स्पर्धांनी सभागृहात रंगत आणली. यावेळी मार्गदर्शन करताना ज्येष्ठ समाजसेविका चंद्रिका चौहान म्हणाल्या, ‘‘महिला कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा अत्यंत उपयुक्त आहेत. स्पर्धेत जय-पराजय असतोच; मात्र यश हे सांघिक प्रयत्नांचे फलित असते. अपयश आले तरी अधिक जोमाने पुढे जाण्याची प्रेरणा या उपक्रमातून मिळते.’’




अध्यक्षीय समारोपात कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीतील भव्य सभागृहाचा या महोत्सवाच्या निमित्ताने प्रथमच वापर सुरू झाल्याची माहिती दिली. हे सभागृह विद्यार्थ्यांसह विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थांसाठी उपलब्ध करून देण्याचा विद्यापीठाचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शिवाजी शिंदे आणि डॉ. यशपाल खेडकर यांनी केले











