सोलापूर : जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंभारी घरकुल शिवारात सुरू असलेल्या ‘शिवा कल्याण’ मटका अड्ड्यावर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने अचानक धडक छापा टाकत ११ जणांना रंगेहाथ पकडले. या कारवाईत फॉर्च्युनर कार, तीन मोटारसायकली, १९ मोबाईल आणि रोख रकमेसह तब्बल ३० लाख २६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कुंभारी येथील मल्लू सुतार यांच्या मालकीच्या जागेत ‘शिवा कल्याण’ नावाने मटका जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरून विशेष पथकाने कारवाईचे नियोजन केले. परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक गणेश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने मटका अड्ड्यावर अचानक छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागण्यापूर्वीच पथकाने अड्ड्याला घेराव घालत तेथे मटका जुगार खेळणाऱ्या ११ जणांना ताब्यात घेतले. घटनास्थळावरून मटका जुगाराशी संबंधित साहित्य तसेच रोख रक्कम आणि अन्य मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
कारवाईदरम्यान एका फॉर्च्युनर कारसह तीन मोटारसायकली आणि १९ मोबाईल फोन ताब्यात घेण्यात आले. रोख रकमेसह जप्त केलेल्या संपूर्ण मुद्देमालाची किंमत ३० लाख २६ हजार ८०० रुपये असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या ११ जणांविरुद्ध वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ग्रामीण भागात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात विशेष पथकाने केलेल्या या मोठ्या कारवाईमुळे मटका आणि जुगार व्यवसाय चालविणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
३०.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त विशेष पथकाच्या कारवाईत ११ जणांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी एक फॉर्च्युनर कार, तीन मोटारसायकली, १९ मोबाईल फोन आणि रोख रकमेसह एकूण ३० लाख २६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे