गर्दी नियंत्रण, आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचा सराव; नागरिकांच्या सुरक्षेसाठी यंत्रणा सज्ज
सोलापूर ;आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासह आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास ती प्रभावीपणे हाताळण्यासाठी सोलापूर शहर पोलिसांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून शुक्रवारी शहरातील गर्दीच्या ठिकाणी मॉकड्रिल घेऊन पोलिस यंत्रणेच्या सज्जतेची चाचणी घेण्यात आली. गणेशोत्सव काळात शहरातील प्रमुख मार्ग, विसर्जन मिरवणुका आणि गर्दीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वर्दळ असते. या पार्श्वभूमीवर गर्दी नियंत्रण, संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे, अचानक निर्माण होणाऱ्या परिस्थितीत तातडीने प्रतिसाद देणे तसेच नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याबाबत पोलिस कर्मचाऱ्यांना प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूरज मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या मॉकड्रिलमध्ये पोलिस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार सहभागी झाले. अचानक घडणाऱ्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कमीत कमी वेळेत घटनास्थळी पोहोचणे, परिसर सुरक्षित करणे आणि परिस्थिती नियंत्रणात आणणे याचा प्रत्यक्ष सराव करण्यात आला.
बंदोबस्तातील त्रुटींचीही पडताळणी
मॉकड्रिलच्या माध्यमातून पोलिसांच्या प्रतिसादाचा वेग आणि उपलब्ध यंत्रणेची कार्यक्षमता तपासण्यात आली. गणेशोत्सवातील बंदोबस्त अधिक प्रभावी करण्यासाठी आवश्यक बाबींची पडताळणी करण्यात आली असून, उत्सव शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे.











