कथा, परंपरा, आरत्या, पाककृती अन् छायाचित्रे अपलोड करा; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे आवाहन
सोलापूर, : सोलापूर जिल्ह्यातील गणेशोत्सवाची समृद्ध परंपरा, कला, संस्कृती आणि वैशिष्ट्यपूर्ण आठवणी आता डिजिटल माध्यमातून जगभर पोहोचणार आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, गृहनिर्माण संस्था, ग्रामपंचायती, सामाजिक-सांस्कृतिक संस्था तसेच नागरिकांनी या डिजिटल लोकचळवळीत सक्रिय सहभाग नोंदवावा. आपल्या परिसरातील गणेशोत्सवाच्या वैशिष्ट्यपूर्ण कथा, परंपरा, पाककृती, आरत्या आणि छायाचित्रे ‘बाप्पा डॉट ओआरजी’ (bappa.org) या संकेतस्थळावर अपलोड करून सोलापूरचा सांस्कृतिक वारसा जगासमोर मांडावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने गणेशोत्सवातील परंपरा, कला, विधी आणि आठवणींचे डिजिटल स्वरूपात जतन करून त्या जागतिक पटलावर मांडण्यासाठी ‘बाप्पा डॉट ओआरजी’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानंतर या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील गणेशोत्सवाशी संबंधित कला, संस्कृती, खाद्यपरंपरा, मूर्तिकला, आरत्या आणि लोककलांचे डिजिटल दस्तऐवजीकरण करण्यात येणार आहे. पुरातत्त्व संचालनालयाने विकसित केलेल्या या डिजिटल मंचावर नागरिकांना घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवातील छायाचित्रे, व्हिडिओ, पाककृती, आरत्या, परंपरा आणि गणेशोत्सवाशी संबंधित आठवणी अपलोड करता येणार आहेत. त्यामुळे पिढ्यान्पिढ्या जपल्या गेलेल्या स्थानिक परंपरांना डिजिटल स्वरूपात कायमस्वरूपी जतन करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
सोलापूरची सांस्कृतिक ओळख जगभर पोहोचणार
सोलापूर जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरा, आकर्षक सजावट, खाद्यसंस्कृती, मूर्तिकला आणि विविध लोककलांची नोंद या माध्यमातून करता येणार आहे. या उपक्रमामुळे सोलापूरची स्वतंत्र सांस्कृतिक ओळख देश-विदेशात पोहोचण्यास मदत होणार असून, स्थानिक कलावंतांना व्यापक व्यासपीठ मिळण्यासोबतच सांस्कृतिक आणि आध्यात्मिक पर्यटनालाही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
सहभाग नोंदवा अन् मिळवा डिजिटल प्रमाणपत्र
या डिजिटल अभियानात आपल्या परिसराची माहिती नोंदविणाऱ्या नागरिकांना शासनाच्या वतीने ‘डिजिटल कल्चरल प्रिझर्वर प्रमाणपत्र’ देऊन गौरविण्यात येणार आहे. नागरिकांनी ‘बाप्पा डॉट ओआरजी’ या संकेतस्थळावर जाऊन ‘तुमची कथा सांगा’ या पर्यायातून आपल्या गणेशोत्सवाशी संबंधित कथा, पाककृती, परंपरा अथवा आरतीची माहिती भरावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.











