सोलापूर : खत खरेदीतील गैरप्रकारांना आळा घालण्याबरोबरच शेतकऱ्यांना आवश्यक खत सहज उपलब्ध करून देण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात २५ सप्टेंबरपासून ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ (एफएफएस) प्रणाली लागू करण्यात येणार आहे. या नव्या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना खताच्या दुकानासमोर रांगेत उभे राहण्याऐवजी मोबाईलवरून जवळच्या केंद्रातील खताचा साठा पाहता येणार असून, गरजेनुसार खताचे आगाऊ बुकिंगही करता येणार आहे.
‘एफएफएस’ प्रणाली थेट शेतकऱ्याच्या फार्मर आयडीशी जोडण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या नावावर असलेले क्षेत्र, त्याने राज्यातील कोणत्या ठिकाणाहून किती खत खरेदी केले, याची माहिती प्रणालीमध्ये उपलब्ध राहणार आहे. परिणामी खत वितरणात पारदर्शकता येण्यास मदत होणार असून, एकाच शेतकऱ्याने वेगवेगळ्या ठिकाणांहून अतिरिक्त खत खरेदी करण्यावरही नियंत्रण येणार आहे.
शेतकऱ्याने ‘एफएफएस’ ॲपवर फार्मर आयडीच्या माध्यमातून लॉगिन केल्यानंतर त्याच्या नावावरील क्षेत्राची माहिती स्क्रीनवर दिसणार आहे. त्यानंतर जवळच्या खत विक्री केंद्रांची माहिती मिळेल. सुरुवातीला चार किलोमीटरच्या परिघातील केंद्रांमधील खतसाठा दाखविला जाणार आहे. या परिसरात उपलब्धता नसल्यास दहा किलोमीटरच्या परिघातील केंद्रांची माहिती शेतकऱ्याला मिळणार आहे. खत बुक केल्यानंतर संबंधित शेतकऱ्याला दोन दिवसांच्या आत खत घेता येणार आहे. स्वतः शेतकरी किंवा त्याच्या कुटुंबातील प्रतिनिधीला बुक केलेले खत घेता येणार असल्याने दुकानांमध्ये होणारी गर्दी आणि रांगा कमी होण्याची शक्यता आहे.
खत बुकिंगची प्रक्रिया एफएफएस ॲप डाउनलोड करा फार्मर आयडीने लॉगिन करा क्षेत्रानुसार युरिया व डीएपीची मागणी नोंदवा जवळच्या उपलब्ध कृषी सेवा केंद्राची निवड करा बुकिंगनंतर मिळालेल्या माहितीनुसार दोन दिवसांत खत ताब्यात घ्या. शेतकऱ्याला काय फायदा? घरबसल्या खताचा साठा पाहता येणार. गरजेनुसार आगाऊ बुकिंग करता येणार. बुक केलेले खत दोन दिवसांत (टी प्लस २) घेता येणार. छापील एमआरपीपेक्षा जादा दराने विक्रीला आळा. अनुदानित खतासोबत टॉनिक, औषधे किंवा अन्य निविष्ठा घेण्याची ‘लिंकिंग’ची सक्ती करता येणार नाही. बुकिंग केल्यानंतर संबंधित विक्रेत्याला खत उपलब्ध करून देणे बंधनकारक राहणार.
‘एफएफएस’मुळे खत वाटप अधिक पारदर्शक आणि विनालिंकिंग होणार आहे. याचा सरकार, कंपन्या, शेतकरी आणि विक्रेत्यांना फायदा होईल. शेतकऱ्यांनी खत खरेदीची नवी प्रक्रिया समजून घेऊन त्यानुसारच खरेदी करावी. विनाॲप खत खरेदी करू नये. या तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी वेळ आणि पैसा वाचवावा. – हरिदास हावळे, जिल्हा कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर