वृक्षतोडीवर उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर आक्रमक; परवानगीची प्रक्रिया, नियम-अटी आणि पर्यायी जागेच्या निर्णयाची चौकशी करण्याचे निर्देश
सोलापूर : शहरातील नागरिकांना आरोग्यसेवा देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाच्या परिसरातील हिरवाईवरच आता विकासकामाच्या नावाखाली कुऱ्हाड चालविली जात असल्याने प्रशासनाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील अस्तित्वात असलेले उद्यान आणि मोठी झाडे तोडण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळताच सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी महेश देवकर यांनी घटनास्थळी धाव घेत वृक्षतोड थांबविण्याच्या सूचना दिल्या. तसेच वृक्षतोडीस परवानगी कोणत्या नियम व अटींच्या आधारे देण्यात आली, याची सविस्तर चौकशी करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
सिव्हिल हॉस्पिटलसारख्या संवेदनशील परिसरात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना सावली, स्वच्छ हवा आणि मानसिक प्रसन्नता देणारे उद्यान आणि मोठी झाडे असताना त्याच जागेवर बांधकाम करण्याचा निर्णय का घेण्यात आला, हा मुख्य प्रश्न आता उपस्थित झाला आहे. विकासकामे आवश्यक असली तरी त्यासाठी अस्तित्वातील हिरवाईच नष्ट करण्याचा पर्याय का स्वीकारण्यात आला, याचे उत्तर प्रशासनाने द्यावे, अशी भूमिका देवकर यांनी घेतली.

वृक्ष प्राधिकरण समितीचा अभिप्राय घेतला का?
महानगरपालिकेची वृक्ष प्राधिकरण समिती अस्तित्वात असताना संबंधित वृक्षतोडीपूर्वी समितीचे मत घेण्यात आले होते का, याची तपासणी करण्याच्या सूचना उपमहापौरांनी दिल्या आहेत. तसेच पर्यावरणतज्ज्ञ आणि वृक्षतज्ज्ञांचा सल्ला घेण्यात आला होता का, वृक्षतोडीसाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या होत्या का आणि त्यासाठी कोणत्या नियम-अटी लागू करण्यात आल्या, याचीही चौकशी होणार आहे. वृक्षतोडीची परवानगी देण्याची प्रक्रिया पारदर्शक आणि नियमानुसार झाली आहे का, हा या संपूर्ण प्रकरणातील महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे.
‘उद्यान वाचविण्याचा पर्याय होता का?’
सिव्हिल हॉस्पिटल परिसरात आधीपासून चांगल्या स्थितीत असलेले उद्यान आणि मोठी झाडे असताना बांधकामासाठी याच जागेची निवड का करण्यात आली, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे. बांधकामासाठी पर्यायी जागा उपलब्ध होऊ शकत होती का, याचा प्रशासनाने विचार केला होता का, याचीही तपासणी होणे आवश्यक असल्याचे देवकर यांनी स्पष्ट केले.रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसाठी केवळ औषधोपचारच नव्हे, तर आरोग्यदायी आणि प्रसन्न वातावरणही महत्त्वाचे असते. रुग्णांचे नातेवाईकही या परिसरातील झाडांच्या सावलीत काही वेळ विश्रांती घेत असतात. अशा परिस्थितीत उद्यान आणि मोठ्या वृक्षांची तोड केल्यास त्याचा थेट परिणाम रुग्ण, नातेवाईक तसेच परिसरातील पर्यावरणावर होणार असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.
विकासकाम की पर्यावरणाचा बळी?
शहराच्या विकासासाठी बांधकामे आवश्यक आहेत; मात्र विकासकामांचे नियोजन करताना पर्यावरणाचा समतोल राखणेही तितकेच महत्त्वाचे आहे. विशेषतः रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यापूर्वी पर्यायी आराखडा, वृक्षांचे स्थलांतर, उपलब्ध इतर जागा आणि पर्यावरणीय परिणाम यांचा विचार झाला का, हा प्रश्न आता चर्चेत आला आहे.“शहरातील वृक्षसंपदा ही केवळ झाडे नसून नागरिकांच्या आरोग्याशी आणि पर्यावरणाशी जोडलेली आहे. त्यामुळे वृक्षतोडीस परवानगी देताना सर्व नियमांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे,” अशी स्पष्ट भूमिका उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी घेतली.











