मुंबई: एफडीएच्या अधिकाऱ्यांनी कार्यक्षेत्राबाहेर जाऊन एसईझेड युनिटवर कारवाया केल्या. त्यामुळे राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयात बिनशर्त माफी मागावी लागली होती. त्याच प्रकरणातील एफडीएच्या चार अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. याआधी १५ ऑक्टोबर रोजी सुपारी घोटाळा केल्याप्रकरणी ५ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. आता निलंबित अधिकाऱ्यांची संख्या नऊ झाली आहे.
याच प्रकरणातील २१ अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीचेही आदेश देण्यात आले आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चार अधिकाऱ्यांच्या निलंबन प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर तात्काळ निलंबनाचे आदेश काढण्यात आले आहेत. टाकवे गाव, तालुका मावळ, जिल्हा पुणे येथे असणारी सोएक्स इंडिया प्रायव्हेट लि. ही कंपनी एसईझेड मध्ये येते. त्यांच्याकडे केवळ हुक्क्यासाठी वापरले जाणारे पदार्थ बनवण्यात येत होते. मात्र त्याला खाद्यपदार्थ गृहीत धरून अधिकाऱ्यांनी कारवाई केली. संबंधित कंपनी उच्च न्यायालयात गेली. त्यानंतर फसाई यांचे स्पष्टीकरण मागवण्यात आले. त्यांनी देखील ज्या वस्तूवर कारवाई केली ते फूड या व्याख्येत येत नाही असे कळवले.
त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असे लेखी शपथपत्र न्यायालयात द्यावे लागले. नंतर या प्रकरणाची विस्तृत चौकशी झाली. मंत्री झिरवाळ यांचे तत्कालीन खासगी सचिव रामदास गाडे यांनी अधिकारी व कर्मचारी यंत्रणेवर दबाव आणून, बेकायदेशीर निर्देश देत, कायद्याच्या कसोटीवर न टिकणारी कारवाई करण्यास भाग पाडले, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. त्यामुळे त्यांचे तात्काळ निलंबन करून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली होती.
हे आहे सोलापूर विलंबित कर्मचाऱ्यांची नावे
दि. व. भोगावडे, सहआयुक्त, पुणे
य. बा. दहातोंडे, सहाय्यक आयुक्त, नागपूर
अशोक इलागेर व च. रा. स्वामी, दोघेही अन्नसुरक्षा अधिकारी, सोलापूर










