सोलापूर: जिल्हा परिषद अंतर्गत ‘जल जीवन मिशन’ (ग्रामीण) प्रकल्पात कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाचा प्रश्न आता मार्गी लागला आहे. या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शासनाकडून ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.गेल्या काही महिन्यांपासून जल जीवन मिशन अंतर्गत काम करणाऱ्या तांत्रिक आणि प्रशासकीय कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले होते.
ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांचे काम प्रभावीपणे सुरू ठेवण्यासाठी हे कर्मचारी अहोरात्र कष्ट उपसत आहेत. निधीअभावी रखडलेल्या वेतनामुळे कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते, मात्र आता निधी प्राप्त झाल्यामुळे त्यांचे थकीत मानधन त्वरित अदा केले जाणार आहे.
या निधीच्या वितरणामुळे जिल्ह्यातील पाणीपुरवठ्याच्या कामांना अधिक गती मिळेल आणि कर्मचाऱ्यांची आर्थिक अडचण दूर होईल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.










