सोलापूर : शहरातील विकास कामांवरून काही शक्ती जाणीवपूर्वक लक्ष इतरत्र वळवत असल्याची खंत व्यक्त करत, हे अत्यंत चुकीचे असल्याचे स्पष्ट मत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेपूर्वी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी शहरातील पाणी प्रश्नावर उपस्थित झालेल्या प्रस्तावाबाबतही सविस्तर भूमिका मांडली. यावेळी महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर , आमदार देवेंद्र कोठे, सभागृह नेते नरेंद्र काळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
शहरातील विविध प्रश्नांवर काही नेत्यांकडून पुरेशी माहिती न घेता केली जाणारी वक्तव्येही अयोग्य असल्याचे सांगत, कोणत्याही विषयावर भाष्य करण्यापूर्वी वस्तुनिष्ठ माहिती घेणे आवश्यक असल्याचा सल्ला त्यांनी दिला. या वक्तव्यातून त्यांनी अप्रत्यक्षपणे आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांना टोला लगावल्याची चर्चा रंगली. दरम्यान, शहरातील कोणत्याही करदात्यावर अतिरिक्त कराचा बोजा टाकला जाणार नाही, असे स्पष्ट संकेत देत त्यांनी महापालिकेच्या आगामी सर्वसाधारण सभेत याच भूमिकेवर निर्णय होईल, असा विश्वास व्यक्त केला. मालमत्ता कर वाढीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या चर्चेत त्यांनी हा महत्त्वपूर्ण खुलासा केला.
विधान परिषदेच्या उमेदवारीबाबत विचारले असता त्यांनी थेट भाष्य टाळत, “पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य असेल,” एवढ्याच शब्दांत प्रतिक्रिया दिली.
शहराच्या विकासासाठी सर्व नेते व पदाधिकाऱ्यांनी परस्पर समन्वय साधून सकारात्मक दृष्टिकोनातून काम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.










