काडतुसे कारमध्ये ठेवताना दुर्घटना; कामगार केदार छत्रे गंभीर जखमी, परिसरात घबराट
सोलापूर : शहरातील जुनी मिल चाळ परिसरातील सहारा गन हाऊससमोर सोमवारी सायंकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान गंधक भरलेल्या काडतुसांचा भीषण स्फोट झाला. स्फोटाचा आवाज संपूर्ण परिसरात घुमल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.


या दुर्घटनेत केदार सिद्धप्पा छत्रे (वय ५३, रा. रामलिंग नगर, विजापूर रोड, सोलापूर) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या दोन्ही पायांना गंभीर भाजल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जुनी मिल चाळ परिसरातील बाळासाहेब प्रभाकर फुल्ले यांच्या मालकीच्या सहारा गन हाऊसमध्ये केदार छत्रे कामाला आहेत. सोमवारी सायंकाळी गंधकाने भरलेली काडतुसे कारमध्ये ठेवत असताना अचानक भीषण स्फोट झाला. स्फोटामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
जखमी केदार छत्रे यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर मार्कंडेय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पथक, बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड (बीडीएस), फॉरेन्सिक टीम तसेच पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी करून स्फोटाचे नेमके कारण शोधण्यास सुरुवात केली आहे.











