सोलापूर : अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणारा शिक्षक पुन्हा त्याच शाळेत रुजू झाल्याची बाब पुढे आली आहे. सोलापूरातील नामांकित शाळेतील अल्पवयीन मुलीचा शिक्षकानेच विनयभंग केल्याप्रकरणी ३० जुलै २०२५ रोजी गुन्हा दाखल झाला होता. आरोपी शिक्षकाचे नाव हनुमंत नलावडे (वय ५६) आहे. जिल्हा न्यायालयाने जामीन फेटाळला. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडून जामीन मिळाला. पण, पीडिता त्याच शाळेत अकरावीत शिकत असतानाही त्या शिक्षकाला पुन्हा तेथेच रूजू करून घेतले. यामुळे तो पीडितेवर दबाव आणू शकतो, अशी भीती पीडितेच्या पालकांना आहे. पीडिता सध्या तेथेच अकरावीत शिकत असल्याने त्याला तेथे घेऊ नये, असा अर्ज पीडितेच्या पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना दिला आहे.

गंभीर गुन्हा, तरी अट्टाहास कशासाठी ?तो शिक्षक पीडितेला ‘आता तू सापडली, क्रिकेटची मुलगी’ असे बोलत होता, अशी कबुली वर्गातील २० विद्यार्थ्यांनी दिली. दुसरीकडे शिक्षणाधिकाऱ्यांनीही त्या शिक्षकाला न्यायालयाच्या अधिन राहून शाळेने दुसऱ्या ठिकाणी रुजू करावे, असे कळविले आहे. तरीपण, नामांकित शाळा गंभीर गुन्ह्यातील शिक्षकाला पुन्हा तेथेच रुजू करून घेण्यासाठी एवढा अट्टाहास का करत आहे, याचे उत्तर पालक शोधत आहेत.

गुन्हा दाखल झाल्यानंतर शिक्षकाविरुद्ध शाळेने कारवाई करावी, असे पत्र मुख्याध्यापकांना दिले आहे. आता जामीन मिळाल्यानंतर न्यायालयाच्या निर्णयाच्या अधिन राहून त्या शिक्षकाला रुजू करून घ्यायचे असल्यास त्याच शाळेत नको, असेही शाळेला कळविले आहे. त्याला पुन्हा रुजू करून घेण्यापूर्वी शाळेने मला कळविणे बंधनकारक आहे, अन्यथा मुख्याध्यापकावर कारवाई होऊ शकते.– सचिन जगताप, माध्यमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर











