नागपूरच्या सहाय्यक पोलिस अधीक्षकपदावरून पोलिस उपआयुक्तपदी बदली
सोलापूर : राज्य शासनाने पोलिस प्रशासनात केलेल्या ताज्या बदल्यांमध्ये नागपूर येथील सहाय्यक पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी वृष्टी जैन यांची सोलापूर शहर पोलिस दलात पोलिस उपआयुक्त (DCP) म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे सोलापूर शहर पोलिस दलाला तरुण आणि कार्यक्षम महिला अधिकाऱ्याचे नेतृत्व लाभणार आहे. वृष्टी जैन या नागपूर येथे सहाय्यक पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत होत्या. कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हे नियंत्रण आणि संवेदनशील प्रकरणांच्या हाताळणीत त्यांनी प्रभावी कामगिरी केली आहे. त्यांच्या प्रशासनिक कौशल्याची दखल घेत शासनाने त्यांची सोलापूरसारख्या महत्त्वाच्या शहरात नियुक्ती केली असल्याचे बोलले जात आहे.


विशेष म्हणजे, वृष्टी जैन या सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) कुशल जैन यांच्या पत्नी आहेत. त्यामुळे प्रशासकीय वर्तुळात या बदलीची विशेष चर्चा रंगली आहे. सोलापूर शहर पोलिस दलात त्यांच्या आगमनामुळे महिला सुरक्षा, वाहतूक नियंत्रण तसेच गुन्हेगारीविरोधातील कारवाई अधिक प्रभावी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.











