सोलापूर : शहर गुन्हे शाखेने बनावट दिव्यांग प्रमाणपत्र तयार करून शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करत निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यासह आठ जणांना अटक केली आहे. या प्रकरणात बनावट कागदपत्रांच्या आधारे दिव्यांग प्रमाणपत्रे तयार करून देण्यात आल्याचे उघड झाले असून, सोलापूर सिव्हिल रुग्णालयातून १ जानेवारी २०२५ ते ३१ जून २०२६ या कालावधीत वितरित करण्यात आलेल्या ३,७१४ दिव्यांग प्रमाणपत्रांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.या प्रकरणी बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्याद वैद्यकीय अधिकारी डॉ. रतीफ देवलाल जंकर यांनी दिली होती.
प्राथमिक तपासात अहमदनगर येथील कंत्राटी लिपिक राजेश भाऊसाहेब जाधव याने बनावट आधारकार्ड व इतर कागदपत्रांच्या आधारे सोलापूर येथील व्यक्तींना ऑनलाइन प्रक्रियेद्वारे दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून दिल्याचे निष्पन्न झाले. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला. तपासादरम्यान आरोपी राजेश जाधव याला अहमदनगर जिल्ह्यातून ताब्यात घेतल्यानंतर या रॅकेटमधील इतर आरोपींची नावे समोर आली. त्यानुसार महेश बाराजे, राजेश दवण, विजय गर्जे, अरुण शिंपी, वसीम शौकत खान, सागर रजपूत आणि निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश कणके यांना अटक करण्यात आली. तपासात आरोपी क्रमांक एक राजेश जाधव याने बनावट आधारकार्ड तयार करण्यासाठी वापरलेले संगणक व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
तसेच बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे तयार करण्यासाठी वापरलेला सोलापूर सिव्हिल रुग्णालयातील संगणकही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पोलिसांच्या तपासात आतापर्यंत आठ संशयास्पद दिव्यांग प्रमाणपत्रे विनातपासणी वितरित झाल्याचे स्पष्ट झाले असून, त्यामागील संपूर्ण साखळीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, तपास सुरू असल्याने आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त एम. राजकुमार, पोलिस उपायुक्त (गुन्हे) डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलिस आयुक्त दिलीप पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने केली.