सोलापूर, दि. ६ : दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांच्या स्थानिक आमदार विकास निधीतून प्रभाग क्र. २६ मधील स्वामी विवेकानंद नगर (भाग-१) येथे करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामाला अखेर पूर्णत्व आले आहे. अनेक वर्षांपासून खराब रस्त्यामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना आता दिलासा मिळाला असून परिसरातील वाहतूक अधिक सुरक्षित, सुलभ आणि सुरळीत झाली आहे.या विकासकामासाठी प्रभाग क्र. २६ (ब) चे नगरसेवक दीपक जमादार यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे. कामाचा दर्जा, नियोजन आणि वेळेत पूर्ण झालेल्या कामामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून नगरसेवक जमादार यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक होत आहे.

परिसरातील विविध स्तरांतील नागरिकांकडून त्यांच्या विकासाभिमुख भूमिकेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची चर्चा आहे.रस्ता पूर्ण झाल्याने शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच वाहनधारकांची गैरसोय दूर झाली आहे. पावसाळ्यात चिखल आणि खड्ड्यांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या आता भूतकाळात जमा झाल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. नव्या रस्त्यामुळे परिसराच्या सौंदर्यातही भर पडली असून मालमत्तांच्या मूल्यावरही सकारात्मक परिणाम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आमदार सुभाष देशमुख यांच्या विकासनिधीतून प्रभागात विविध नागरी सुविधांची कामे वेगाने सुरू असून, मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्याच्या धोरणामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. स्वामी विवेकानंद नगरातील रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने परिसरातील विकासाला नवी गती मिळाली असून, आगामी काळातही अशाच दर्जेदार विकासकामांची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.











