सोलापूर : समग्र शिक्षा अभियानांतर्गत कंत्राटी पद्धतीवर कार्यरत असताना निधन झालेल्या कै. सौदागर गोविंदराव वाघमारे यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा यासाठी सोलापूर महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळातील अधिकारी, कर्मचारी आणि महानगरपालिका शाळांतील शिक्षकांनी माणुसकीचे दर्शन घडवत सुमारे पाच लाख रुपयांचा मदतनिधी उभारला. समग्र शिक्षा अभियानात विषय साधन व्यक्ती म्हणून कार्यरत असलेल्या कै. वाघमारे यांचे १६ मे २०२६ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. कंत्राटी सेवेमुळे त्यांच्या निधनानंतर शासनाकडून कोणत्याही आर्थिक लाभाची तरतूद नसल्याने कुटुंबास आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता.
ही बाब लक्षात घेऊन प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी मल्हारी माने यांनी मदतीचे आवाहन केले. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत अधिकारी, कर्मचारी, शिक्षक तसेच समग्र शिक्षा अभियानातील विशेष विषय साधन व्यक्ती व विशेष शिक्षकांच्या सहकार्याने सुमारे पाच लाख रुपयांचा निधी संकलित करण्यात आला. संकलित मदतनिधी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे आणि शिक्षण विभागाचे नियंत्रण अधिकारी तथा मुख्य लेखाधिकारी डॉ. रत्नराज जवळगेकर यांच्या हस्ते वाघमारे कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आला. यावेळी आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी संकटाच्या काळात सहकाऱ्याच्या कुटुंबासाठी दाखविलेली संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
याप्रसंगी प्रशासन अधिकारी मल्हारी माने, पर्यवेक्षक मनीष बांगर, रजनी राऊळ, सुरेश कासार, निलोफर सय्यद, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी रियाज अत्तार, समन्वयक अविनाश शिंदे, अमोल गायकवाड, ज्ञानेश्वर गरड, सुवर्णा गुरव, लक्ष्मण पुजारी, गुरुप्रसाद तलवार यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.