सोलापूर | सोलापूर शहरातील नागरी सुविधा अधिक सक्षम करण्याबरोबरच विविध विकासकामांना गती देण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेने आपल्या वाहनांच्या ताफ्यात सात नवीन बोलेरो वाहनांची भर घातली आहे. महापालिकेच्या विविध विभागांच्या दैनंदिन कामकाजासाठी आणि क्षेत्रीय पाहणीसाठी या वाहनांचा उपयोग होणार आहे. विशेष म्हणजे, केंद्र शासनाच्या गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (GeM) पोर्टलच्या माध्यमातून महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीकडून ही वाहने थेट खरेदी करण्यात आली असून, त्यासाठी महापालिकेच्या तिजोरीतून तब्बल ५३ लाख ८३ हजार ६०९ रुपये खर्च करण्यात आले आहेत.
महापालिकेच्या इंद्रभुवन परिसरात आयोजित कार्यक्रमात महापौर विनायक कोंड्याल, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांच्या हस्ते सातही नवीन वाहनांचे विधिवत पूजन करण्यात आले. या वेळी महापालिकेचे पदाधिकारी, विविध विभागांचे प्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते. सोलापूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, विद्युत, बांधकाम यांसह विविध विभागांमार्फत शहरात मोठ्या प्रमाणावर नागरी सुविधा आणि विकासकामे राबविण्यात येतात. या कामांची प्रत्यक्ष पाहणी करणे, कामांच्या प्रगतीचा आढावा घेणे, नागरिकांच्या तक्रारींची दखल घेणे आणि आवश्यक त्या ठिकाणी तातडीने पोहोचण्यासाठी अधिकाऱ्यांना वाहनांची आवश्यकता भासते. त्यामुळे नव्या वाहनांच्या समावेशामुळे विभागीय कामकाज अधिक गतिमान होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
महापालिकेने खरेदी केलेल्या एका बोलेरो वाहनाची किंमत ७ लाख ६९ हजार ८७ रुपये असून, सात वाहनांसाठी एकूण ५३ लाख ८३ हजार ६०९ रुपये खर्च करण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या GeM पोर्टलवरून थेट उत्पादक कंपनीकडून ही खरेदी करण्यात आली आहे. दरम्यान, शहराचा वाढता विस्तार आणि नागरी सुविधांवरील वाढता ताण लक्षात घेता महापालिकेच्या विविध विभागांना क्षेत्रीय स्तरावर अधिक सक्रिय राहावे लागणार आहे. पाणीपुरवठ्यातील अडचणी, स्वच्छतेच्या समस्या, रस्त्यांची दुरवस्था, विद्युत व्यवस्थेतील बिघाड तसेच विकासकामांच्या गुणवत्तेची पाहणी करण्यासाठी नव्या वाहनांचा प्रभावी वापर होणे आवश्यक आहे. त्यामुळे केवळ वाहनांची संख्या वाढविण्यापुरते मर्यादित न राहता त्याचा प्रत्यक्ष फायदा नागरिकांना कितपत होतो, हेही महत्त्वाचे ठरणार आहे.
या कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, पृथ्वीराज कोंड्याल, कार्यकारी अभियंता (विद्युत) राजेश परदेशी, नगर अभियंता नीलकंठ मठपती, वाहन विभागप्रमुख गिरीश पुकाळे, मुन्ना तळीखडे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
५३ लाखांची वाहने; नागरिकांच्या समस्या सुटणार किती वेगाने? महापालिकेच्या ताफ्यात सात नवीन बोलेरो वाहने दाखल झाल्याने प्रशासकीय यंत्रणेला क्षेत्रीय पाहणीसाठी अतिरिक्त सुविधा उपलब्ध होणार आहेत. मात्र, शहरातील रस्त्यांवरील खड्डे, विस्कळीत पाणीपुरवठा, स्वच्छता आणि इतर नागरी समस्यांवर किती वेगाने कार्यवाही होते, यावरच या वाहनांच्या खरेदीची उपयुक्तता ठरणार आहे. नव्या वाहनांमुळे अधिकाऱ्यांच्या दौऱ्यांची संख्या वाढण्याबरोबरच नागरिकांच्या तक्रारींचे निराकरणही जलद होणे अपेक्षित आहे.