सोलापूर | ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि वेळेवर आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील मूलभूत समस्या दूर व्हाव्यात, यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. याच अनुषंगाने उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी प्राथमिक आरोग्य केंद्रात रविवारी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांच्या उपस्थितीत जनआरोग्य समिती व रुग्ण कल्याण समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी त्यांनी आरोग्य केंद्राची प्रत्यक्ष पाहणी करून तेथील विविध समस्यांचा आढावा घेतला.
मार्डी प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित या बैठकीत रुग्णांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधा, केंद्रातील पाणीपुरवठ्याची समस्या, कर्मचारी वर्गाच्या अडचणी तसेच दैनंदिन कामकाजात येणाऱ्या अडथळ्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून विविध समस्यांची माहिती जाणून घेतल्यानंतर त्या सोडविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र हा आरोग्य सेवेचा महत्त्वाचा आधार आहे. विशेषतः गरीब, शेतकरी, शेतमजूर, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना प्राथमिक उपचारांसाठी या केंद्रांवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे आरोग्य केंद्रात आवश्यक त्या सुविधा उपलब्ध असणे, पाणीपुरवठा सुरळीत राहणे आणि रुग्णांना वेळेवर वैद्यकीय सेवा मिळणे अत्यंत आवश्यक असल्याचे या बैठकीत अधोरेखित करण्यात आले.
जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी आरोग्य केंद्राची पाहणी करताना वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. आरोग्य केंद्राच्या कामकाजात येणाऱ्या अडचणी समजून घेत त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने चर्चा केली. ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवेसाठी अनावश्यक त्रास सहन करावा लागू नये, यासाठी उपलब्ध यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच आरोग्य केंद्रांमधील अडचणी दूर करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही इंद्रजीत पवार यांनी यावेळी दिली. आरोग्य केंद्रांमधील मूलभूत सुविधांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीस उत्तर सोलापूर पंचायत समितीच्या सभापती तेजस्विनी बोराडे, मार्डी गावच्या सरपंच प्रांजली पवार, ज्येष्ठ नेते आप्पास कदम, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आव्हाळे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष बारसुळे, सोनाली रणदिवे यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.