सोलापूर : पाथरूड चौक परिसरातील बेघर झालेल्या कुटुंबांच्या पुनर्वसनाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या नागरिकांनी गुरुवारी सोलापूर महानगरपालिका मुख्यालयात आक्रमक भूमिका घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. आंदोलनकर्त्यांपैकी काहींनी महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने प्रशासन आणि पोलिस यंत्रणेची धावपळ उडाली.
मात्र, अधिकाऱ्यांच्या तत्पर हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला.पाथरूड चौकातील बाधित कुटुंबांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नावर युवा भीमसेनेचे महेश डोलारे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. प्रशासनाने पुनर्वसनाबाबत ठोस निर्णय न घेतल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी यापूर्वीही तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. गुरुवारी दुपारी आंदोलकांचा एक गट महापालिका आवारात दाखल झाला. आयुक्तांच्या दालनासमोर घोषणाबाजी करत त्यांनी सोबत आणलेल्या बाटल्यांतील डिझेल अंगावर ओतण्यास सुरुवात केली.
या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. उपस्थित पोलिस कर्मचारी, सुरक्षारक्षक तसेच अधिकाऱ्यांच्या अंगरक्षकांनी तातडीने हस्तक्षेप करून आंदोलनकर्त्यांना रोखले व त्यांच्या ताब्यातील डिझेलच्या बाटल्या जप्त केल्या.दरम्यान, काही महिला आंदोलनकर्त्यांनीही अंगावर डिझेल ओतल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली होती. घटनेची माहिती मिळताच नगरसेवक शिवानंद पाटील आणि अनंत जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.