जयंत आसगावकरांना दुसऱ्यांदा उमेदवारी; शिक्षक मतदारसंघाच्या रणांगणात राजकीय हालचालींना वेग
सोलापूर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून, पुणे शिक्षक मतदारसंघात काँग्रेसने आपला उमेदवार निश्चित केला आहे. विद्यमान आमदार जयंत दिनकर आसगावकर यांना काँग्रेसने पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करत त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे पुणे शिक्षक मतदारसंघातील राजकीय समीकरणांना आता वेग आला आहे.काँग्रेसने पुणे शिक्षक मतदारसंघासोबतच अमरावती शिक्षक मतदारसंघातून आदिती पोहरे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघातून विद्यमान आमदार अभिजीत वंजारी यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

या घोषणेमुळे संबंधित मतदारसंघांमध्ये निवडणुकीच्या तयारीला अधिकृतपणे गती मिळाली आहे.पुणे शिक्षक मतदारसंघात मात्र उमेदवारीवरून महायुतीतील हालचाली अद्याप चर्चेत आहेत. मंगेश चिवटे यांनी या मतदारसंघातून उमेदवारीसाठी दावा केला असून, भाजप आणि शिवसेना यांच्यात जागावाटपावरून रस्सीखेच सुरू असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे काँग्रेसने आसगावकरांचे नाव जाहीर केल्यानंतर विरोधकांकडून कोणता चेहरा मैदानात उतरतो, याकडे शिक्षक मतदारांचे लक्ष लागले आहे.दरम्यान, महाराष्ट्रातील तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार असून २७ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर असून ९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे.आसगावकरांना पुन्हा संधी मिळाल्याने काँग्रेसच्या गोटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दुसरीकडे महायुतीकडून अंतिम उमेदवार कोण असेल, यावर पुणे शिक्षक मतदारसंघातील पुढील राजकीय चित्र अवलंबून राहणार आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत या मतदारसंघातील राजकीय घडामोडींना आणखी वेग येण्याची शक्यता आहे.












