25 जून रोजी पुण्यात पहिली बैठक; राज्यस्तरीय समितीत सोलापूरला प्रतिनिधित्व
सोलापूर :कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडून आकारण्यात येणाऱ्या यूजर चार्जेस संदर्भातील धोरण आणि अंमलबजावणीचा अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाने स्थापन केलेल्या समितीवर श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा माजी आमदार दिलीपराव माने यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. समितीची पहिली बैठक 25 जून 2026 रोजी दुपारी 3 वाजता पुणे येथे पणन संचालकांच्या दालनात होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या 28 मार्च 2022 रोजीच्या राजपत्रानुसार महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, 1963 मधील कलम 31 मध्ये दुरुस्ती करून कलम 31 (1अ) नव्याने समाविष्ट करण्यात आले आहे. या तरतुदीनुसार बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात व्यापारासाठी उपलब्ध करून दिलेल्या जागा व सुविधांचा वापर करून होणाऱ्या अनुसूचित नसलेल्या शेतमाल व अकृषिक मालाच्या व्यापारावर यूजर चार्जेस आकारण्याचे अधिकार बाजार समित्यांना प्रदान करण्यात आले आहेत.
राज्याचे पणन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली 9 जून रोजी झालेल्या बैठकीत यूजर चार्जेस आकारणीबाबत सविस्तर अभ्यास व शिफारसी करण्यासाठी समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार स्थापन झालेल्या या समितीत पुणे महसुली विभागातून श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा माजी आमदार दिलीपराव माने यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
समितीच्या माध्यमातून यूजर चार्जेस आकारणीसंदर्भातील धोरणात्मक बाबी, बाजार समित्यांचे अधिकार आणि व्यापारी तसेच शेतकरी हित लक्षात घेऊन आवश्यक शिफारसी करण्यात येणार असल्याची माहिती पणन संचालक शरद जरे यांनी दिली. माने यांच्या निवडीमुळे सोलापूर जिल्ह्याला राज्यस्तरीय समितीत प्रतिनिधित्व मिळाल्याने बाजार समिती क्षेत्रात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.