सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील ति-हे येथे श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात शुक्रवारी (दि. १० जुलै) महत्त्वपूर्ण नियोजन बैठक उत्साहात पार पडली. पालखी सोहळा सुरळीत, सुरक्षित आणि भक्तिमय वातावरणात पार पाडण्यासाठी विविध विभागांच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यानंतर प्रशासनातील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करून आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा केली.
या बैठकीस उत्तर सोलापूर पंचायत समितीच्या सभापती तेजस्विनी बोराडे, उपसभापती सुनील भोसले, पंचायत समिती सदस्या सुनीता बारस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती. गटविकास अधिकारी राजाराम भोंग यांनी विविध विभागांच्या तयारीचा आढावा घेत पालखी सोहळ्याच्या नियोजनाची माहिती दिली. यावेळी सभापती तेजस्विनी बोराडे यांनी वारकऱ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या. सोहळ्यादरम्यान आरोग्य सुविधा सक्षम ठेवाव्यात, आवश्यक वैद्यकीय पथके तैनात करावीत तसेच अतिरिक्त आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याबाबतही त्यांनी निर्देश दिले. उपसभापती सुनील भोसले यांनी ति-हे ग्रामस्थांनी दिंडी व पालखी सोहळ्याच्या नियोजनासाठी केलेल्या तयारीचे कौतुक करत गावकऱ्यांच्या सहभागाला विशेष दाद दिली.
बैठकीनंतर उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पालखी मार्ग, मुक्काम स्थळ आणि अन्य सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सुविधा, वाहतूक व्यवस्थापन आणि वारकऱ्यांच्या निवासासंदर्भातील तयारीची तपासणी करून आवश्यक सुधारणा करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. यावेळी शिवाजी घोडके पाटील, बाळासाहेब सुरवसे, तालुक्यातील विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, स्थानिक अधिकारी व कर्मचारी, ग्रामपंचायत प्रशासक गोवर्धन जगताप, सरपंच, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, संत गजानन महाराज पालखी सोहळा निर्विघ्न, शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात पार पडावा यासाठी प्रशासन आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे कंबर कसली असून, संपूर्ण यंत्रणा सज्ज झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.