सोलापूर, दि. १५ ऑगस्ट : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सोलापूर जिल्हा परिषदेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात स्वातंत्र्य दिनाचा सोहळा देशभक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक अरुण वैद्य यांच्या शुभहस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाला अभिवादन केले.


या सोहळ्यास महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अमृता नागनाथ वाघे, जिल्हा परिषद सदस्या चैताली मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, महिला व बालकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले, आरोग्य अधिकारी सतीश कोपुरवाड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख, माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्यासह जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रध्वजाला मानवंदना, देशभक्तीचा जयघोष आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे जिल्हा परिषद परिसरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह ओसंडून वाहत होता.











