सोलापूर : दारू आणि गांजाच्या व्यसनातून कुटुंबीयांना सतत त्रास देणाऱ्या मुलाचा गळा दाबून खून केल्याच्या आरोपाखाली खटल्याला सामोरे जाणाऱ्या वडिलांसह चौघांची सोलापूर सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. सुमारे सहा वर्षांपूर्वी घडलेल्या या प्रकरणात सरकारी पक्षाकडून आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसे सबळ पुरावे सादर न झाल्याने न्यायालयाने हा निकाल दिला. या खटल्यात बचाव पक्षातर्फे ॲड. जयदीप माने यांच्यासह अन्य वकिलांनी काम पाहिले.
या प्रकरणाची हकीकत अशी की, सोलापूर-अक्कलकोट रस्त्यावरील जामदार वस्तीजवळ २८ जानेवारी २०२० रोजी शैलेश (वय ३१) याचा गळा दाबून खून करण्यात आल्याचा आरोप होता. या प्रकरणी मृताचे वडील सुरेश सिद्धलिंग घोंगडे (रा. मार्डी, ता. उत्तर सोलापूर) यांच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सरकारी पक्षाच्या म्हणण्यानुसार, शैलेश याला दारू आणि गांजाचे व्यसन होते. व्यसनासाठी तो वडिलांकडे वारंवार पैशांची मागणी करीत असे. पैसे न दिल्यास वडिलांना मारहाण करण्याबरोबरच दारूच्या नशेत आई, भाऊ आणि भावजय यांनाही मारहाण करीत असल्याचा आरोप होता. तसेच घरातील साहित्याची नासधूस करीत असल्याने संपूर्ण कुटुंब त्याच्या त्रासाला कंटाळले होते. या सततच्या त्रासाला वैतागून वडील सुरेश घोंगडे यांनी साथीदारांच्या मदतीने शैलेशचा गळा दाबून खून केल्याचा दावा सरकारी पक्षाने केला होता. याप्रकरणी वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास पूर्ण करून आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
या खटल्याची सुनावणी सोलापूर सत्र न्यायालयात झाली. सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने मांडलेले आरोप आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आरोपींवरील गुन्हा सिद्ध होतो का, याबाबत न्यायालयाने विचार केला. बचाव पक्षातर्फे आरोपींची बाजू मांडण्यात आली. अखेर आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसे सबळ पुरावे नसल्याने न्यायालयाने वडिलांसह चारही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या खटल्यात आरोपींतर्फे ॲड. धनंजय माने, ॲड. जयदीप माने, ॲड. विकास मोटे आणि ॲड. प्रणित जाधव यांनी काम पाहिले.
सहा वर्षांनंतर खुनाच्या आरोपातून मुक्तता जानेवारी २०२० मध्ये घडलेल्या या प्रकरणात मृताच्या वडिलांसह चौघांना खुनाच्या आरोपाला सामोरे जावे लागले होते. कौटुंबिक वाद आणि व्यसनाधीनतेच्या पार्श्वभूमीवर दाखल झालेल्या या खटल्यात सरकारी पक्षाला आरोप सिद्ध करता आले नाहीत. त्यामुळे सुमारे सहा वर्षांनंतर न्यायालयाने चारही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.