पंढरपूर, : आषाढी शुद्ध एकादशी सोहळा २५ जुलै २०२५ रोजी होत असून या सोहळ्यासाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत तुकाराम महाराज यांच्यासह विविध संतांच्या पालखी सोहळ्यांबरोबर लाखो वारकरी भाविक पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत. या पार्श्वभूमीवर पालखी मार्ग, पालखीतळ, विसावा व रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी पाणी, आरोग्य, सुरक्षा आणि स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांनी दिले.
आषाढी वारी नियोजनासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अप्पर आयुक्त तुषार ठोंबरे, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे, प्रांताधिकारी सचिन इथापे, विजया पांगारकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत विभागीय आयुक्त तेली-उगले यांनी पालखी मार्गावरील तसेच पालखीतळांकडे जाणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती वारीपूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. पालखीतळांवर आवश्यक ठिकाणी मुरूमीकरण, स्वच्छता, मुबलक पाणीपुरवठा, वीज आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यावर त्यांनी भर दिला. नातेपुते येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखीतळाच्या वाढीव जागेबाबत तातडीने कार्यवाही करावी, तसेच पालखीतळांवरील अतिक्रमणे हटवून वारकऱ्यांसाठी अधिक प्रशस्त व्यवस्था निर्माण करावी, असे निर्देश त्यांनी दिले. याशिवाय पालखी तळांवर हायमास्ट दिव्यांची संख्या वाढवून रात्रीच्या वेळी प्रकाशव्यवस्था सक्षम करण्यावरही भर देण्यात आला.




श्री संत सोपानकाका पालखी सोहळ्यासाठी भंडीशेगाव येथे नव्याने उपलब्ध झालेल्या पालखीतळावरील जलसंपदा विभागाच्या जुन्या इमारती ३० जूनपूर्वी पाडून त्या ठिकाणी सपाटीकरण व मुरूमीकरण करण्यात यावे. तसेच पालखीतळ स्वच्छ, सुरक्षित आणि वारकऱ्यांसाठी सुयोग्य करण्यासाठी आवश्यक ती सर्व कामे तातडीने पूर्ण करावीत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

वारकऱ्यांच्या सोयीसाठी सर्व आवश्यक ठिकाणी शौचालयांची उभारणी करून स्वच्छता व्यवस्थेवर विशेष लक्ष देण्याचे निर्देश देताना, वारी काळात कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन विभागीय आयुक्तांनी केले. लाखो भाविकांच्या श्रद्धेचा हा सोहळा अधिक सुव्यवस्थित आणि सुरक्षित करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.










