गणेशोत्सवानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन; आरोग्य शिबिरासह व्याख्यानांची मेजवानी
सोलापूर : विजापूर रोड, सैफुल परिसरातील ओम गर्जना चौकात युवा शक्ती सामाजिक व सांस्कृतिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत रविवारी (दि. २० सप्टेंबर) नामवंत कीर्तनकार शिवलीला पाटील (महाराज) यांचे विशेष कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.
रविवारी सायंकाळी ७ वाजता शिवलीला पाटील यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार असून, परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडळाने महिलांसाठी रांगोळी स्पर्धा व विविध गुणदर्शन कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. तसेच रविवारी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे धार्मिक कार्यक्रमांसोबतच सामाजिक उपक्रमांनाही मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवात प्राधान्य दिले आहे.
याशिवाय सोमवारी (दि. २१) सायंकाळी ७ वाजता डॉ. स्वप्नील चौधरी यांचे व्याख्यान, तर मंगळवारी (दि. २२) सायंकाळी ७ वाजता समाज प्रबोधनकार पवन महाराज दडवे-चंपेकर यांचे व्याख्यान होणार आहे. बुधवारी सायंकाळी ६ वाजता कलाकारांच्या गीतांचा विशेष कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे. या सर्व कार्यक्रमांची तयारी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत असून, गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक उपासनेसह सामाजिक प्रबोधन, आरोग्यविषयक जनजागृती आणि सांस्कृतिक उपक्रमांचा संगम साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
मंडळाचे अध्यक्ष समीर कमळे, उपाध्यक्ष नागेश कोंसिगाव, समर्थ जाधव, कार्याध्यक्ष आकाश गायकवाड, सचिव नागेश कलशेट्टी, शुभम मंजर्तकर, लेझीम प्रमुख सिद्धाराम हळद, योगीराज निंबाळे यांच्यासह पदाधिकारी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी परिश्रम घेत आहेत **