सोलापूर, : ए. जी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, सोलापूर येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांनी अंध व दृष्टिहीन व्यक्तींसाठी उपयुक्त ठरणारी ‘स्मार्ट ब्लाइंड स्टिक’ विकसित केली आहे. आधुनिक सेन्सर तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेला हा प्रकल्प सुरक्षित आणि स्वावलंबी प्रवासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या प्रकल्पाची निर्मिती विद्यार्थिनी श्रुतिका धोत्रेकर, अक्षया गुंडे, रोहिणी पाठरूड आणि सुकन्या रवी यांनी प्रा. पी. बी. सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली केली. प्रकल्पासाठी समन्वयक प्रा. आर. व्ही. बिराजदार यांचेही मार्गदर्शन लाभले.या स्मार्ट स्टिकमध्ये अल्ट्रासोनिक सेन्सर, मायक्रोकंट्रोलर आधारित नियंत्रण प्रणाली तसेच ध्वनी आणि व्हायब्रेशन अलर्टची सुविधा देण्यात आली आहे. मार्गातील भिंती, खड्डे, अडथळे किंवा इतर वस्तूंची पूर्वसूचना मिळाल्याने दृष्टिहीन व्यक्तींना सुरक्षितपणे चालण्यास मदत होते. दैनंदिन जीवन अधिक सुलभ करणे आणि अपघातांची शक्यता कमी करणे हा या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आहे.
या अभिनव प्रकल्पाबद्दल संस्थेचे अध्यक्ष एस. ए. पाटील, सचिव एस. एस. पाटील, कॅम्पस डायरेक्टर डॉ. एम. ए. चेंगुळे, प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. पोतदार आणि विभागप्रमुख डॉ. आर. व्ही. देसरेकर यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक प्राध्यापकांचे अभिनंदन करून पुढील संशोधनासाठी शुभेच्छा दिल्या.