करमाळा, : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत कार्यरत असलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), करमाळा या संस्थेचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, करमाळा, जि. सोलापूर’ असे नामकरण करण्यात येत असून, त्याचा नामांतर सोहळा मंगळवार (दि. ३० जून) रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ऑनलाइन माध्यमातून उपस्थितांना मार्गदर्शन करणार असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. याशिवाय विविध लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, सामाजिक, शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरही कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
ज्येष्ठ संघ प्रचारक मदनदास देवी यांनी राष्ट्रसेवा, संघटन कौशल्य आणि युवकांमध्ये राष्ट्रभावना जागृत करण्यासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव म्हणून या संस्थेला त्यांचे नाव देण्यात येत आहे. त्यांच्या कार्यातून भावी पिढीला प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील नागरिक, माजी विद्यार्थी, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी तसेच सर्व संबंधितांनी या ऐतिहासिक सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.