सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे आणिपरिसरातील ८ ते १० गावांचा गेल्या दोन दशकांपासून प्रलंबित असलेला वीज प्रश्न आता कायमचा सुटणार आहे. खासदार प्रणिती शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे तिऱ्हे येथील नियोजित ३३/११ के.व्ही. वीज उपकेंद्रासाठी हिरज येथील गायरान जागा मंजूर करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबतचे अधिकृत आदेश महावितरणला दिले आहेत.तिऱ्हे, हिरज, शिवणी, पाथरी, बेलाटी आणि तेलगाव या भागातील शेतकऱ्यांना कमी दाबाने वीज मिळणे, वारंवार वीजपुरवठा खंडित होणे आणि लोडशेडिंग अशा गंभीर समस्यांचा सामना करावा लागत होता. महावितरणकडे निधी उपलब्ध असूनही योग्य शासकीय जागा मिळत नसल्याने हे काम रखडले होते. हिरज गाव भेटीदरम्यान स्थानिक ग्रामस्थांनी ही व्यथा खासदार शिंदे यांच्याकडे मांडली होती.

खासदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागांकडे सातत्याने पाठपुरावा करून जागेचा प्रश्न मार्गी लावला. या नवीन उपकेंद्रामुळे:शेतकऱ्यांना शेतीसाठी पूर्ण दाबाने वीज मिळेल.पिण्याच्या पाणी योजनांचा वीजपुरवठा सुरळीत होईल.स्थानिक उद्योग आणि दैनंदिन कामकाजातील अडथळे दूर होतील.२० ते २५ वर्षांपासून रखडलेला हा प्रश्न मार्गी लागल्याने संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण असून, ग्रामस्थांनी खासदार प्रणिती शिंदे यांचे आभार मानले आहेत. लवकरच या उपकेंद्राच्या प्रत्यक्ष उभारणीला सुरुवात होणार आहे.











