जणांवर गुन्हे दाखल; ५० लाखांचा मुद्देमाल जप्त, ग्रामस्थांकडून कारवाईचे स्वागत
बार्शी ; बार्शी–लातूर राज्य महामार्गावरील जामगाव परिसरातील ‘लवंगी मिरची’ कला केंद्रावर बार्शी तालुका पोलिसांनी मध्यरात्री धाड टाकत मोठी कारवाई केली. नियमांचे उल्लंघन करून रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या कला केंद्रावर पोलिसांनी कारवाई करत नर्तिका, कर्मचारी, चालक, ग्राहक आणि मालकांसह एकूण ७२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश माने यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी मध्यरात्रीनंतर सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. निर्धारित वेळेच्या पुढे कला केंद्र सुरू ठेवण्यात आल्याने भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि दारूबंदी कायद्यान्वये संबंधितांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले. कारवाईदरम्यान पोलिसांनी कला केंद्र परिसरातून मोबाईल फोन, देशी-विदेशी मद्यसाठा, रोख रक्कम तसेच दुचाकी आणि चारचाकी वाहनांसह सुमारे ५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक बालाजी वळसणे, दत्तात्रय भालेराव, पोलीस हेडकॉन्स्टेबल धनराज केकाण, राहुल बोंदर, चंद्रकांत घोळवे तसेच स्वाती काटे, बिरकुले, कांबळे, चौधरी, खराडे आणि अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.


ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त
‘लवंगी मिरची’ कला केंद्रावर झालेल्या कारवाईनंतर जामगाव परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. परिसरात रात्री उशिरापर्यंत सुरू राहणारा कर्णकर्कश आवाज, वाहनांची सततची वर्दळ, मद्यधुंद युवकांचा वावर आणि वारंवार होणारे वाद यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. या कारवाईमुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी केवळ तात्पुरत्या कारवाईवर न थांबता संबंधित थिएटर कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.











