पुणे | प्रतिनिधी : पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, भाजप-महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणुकीच्या रणशिंगाचा बिगुल वाजविला आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिता योगेश जाधव, तर पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी महायुतीच्या पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची उपस्थिती होती. त्यामुळे पुणे विभागातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीला आता चांगलीच रंगत येण्याची चिन्हे आहेत.पुणे पदवीधर मतदारसंघासाठी डॉ. स्मिता योगेश जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिक्षण क्षेत्राशी संबंधित असलेल्या जाधव यांच्या उमेदवारीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. तर शिक्षक मतदारसंघातून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांना भाजपने संधी दिली आहे.उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पदवीधर आणि शिक्षकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्न, पदवीधरांच्या अपेक्षा, रोजगाराच्या संधी तसेच शिक्षकांच्या अडचणी यावर आगामी काळात प्रचारात भर राहण्याची शक्यता आहे. यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह भाजप-महायुतीचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.दरम्यान, पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून महायुतीतील घटक पक्षांमध्ये मतभेद असल्याचे वृत्तही समोर आले आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाकडून मंगेश चिवटे यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याची भूमिका घेतल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आगामी काळात या मतदारसंघातील राजकीय समीकरणे अधिक स्पष्ट होणार आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने आता पदवीधर आणि शिक्षक मतदारांशी थेट संवाद साधण्याच्या हालचालींना वेग येणार आहे. दोन्ही मतदारसंघांत विविध राजकीय पक्षांचे उमेदवार आणि संभाव्य उमेदवार मैदानात उतरण्याच्या तयारीत असल्याने निवडणूक प्रचाराला आगामी काळात अधिक धार येण्याची शक्यता आहे.