टीम अॅक्वाबाइट प्रथम तर द्वितीय टीम सुपरनोवा
सोलापूर : “संवेद २०२६ हॅकाथॉनमधून शहरातील नागरी समस्यांवर अनेक अभिनव आणि व्यवहार्य उपाय समोर आले आहेत. विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूरच्या विकासाला नवी दिशा मिळेल. या कल्पनांची अंमलबजावणी करून शहरातील सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ,” असे प्रतिपादन सोलापूरचे महापौर विनायक कोंडयाल यांनी केले.
एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठात सोलापूर महानगरपालिकेच्या सहकार्याने आयोजित ‘संवेद २०२६’ स्मार्ट गव्हर्नन्स हॅकाथॉनच्या अंतिम प्रकल्प प्रदर्शन व पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते. या राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमात देशभरातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत नागरी समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय सादर केले.
पारितोषिक वितरण समारंभ सोलापूरचे माननीय महापौर विनायक कोंडयाल, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, अच्युत गोडबोले, प्रा. कृष्णा वेदुला, प्रा. विल्यम ओक्स, एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. गोपाळकृष्ण जोशी, उपायुक्त आशिष लोकरे , संचालक राघवेंद्र एम. चाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमास महापालिका उपायुक्त आशिष लोकरे, विद्यापीठाचे कुलसचिव प्राणेश मुरनाळ, डॉ. प्रभा कासलीवाल, डॉ. दर्शन रुईकर, डॉ. आनंद शिंपी उपस्थित होते. महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी सुचवलेल्या उपाययोजनांना प्रत्यक्ष प्रकल्पांमध्ये रूपांतर करण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे.यासाठी आम्ही आवश्यक ते आर्थिक, पायाभूत आणि मनुष्यबळाचे साहाय्य देण्यात येईल. पुढील सहा महिने ते एक वर्षाच्या कालावधीत या संकल्पनांचा पाठपुरावा करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना इंटर्नशिपची संधीही उपलब्ध करून देण्यात येईल.
एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. गोपळकृष्ण जोशी म्हणाले, विद्यापीठ म्हणून आम्ही विद्यार्थ्यांना समस्या-निवारक म्हणून घडवण्यासाठी कटिबद्ध आहोत. ‘हॅकाथॉन’ हा आजच्या जेन-झी’ला (Gen Z) समस्या सोडवण्याच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचा एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे. या हॅकाथॉनमध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या उपायांची गुणवत्ता आणि नाविन्यता अत्यंत उल्लेखनीय आहे.
हॅकाथॉनची ठळक वैशिष्ट्ये :
- देशातील १० राज्यांतील २७००+ विद्यार्थ्यांचा सहभाग
- एकूण ५४६ संघांची नोंदणी; ७५ संघांची निवड
- अंतिम फेरीत २५ उत्कृष्ट संघांचा प्रवेश
- नागरी समस्या : वाहतूक, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, पार्किंग .
- तज्ज्ञ मार्गदर्शन व MATLAB कार्यशाळेमुळे कौशल्यवृद्धी
- आंतरशाखीय सहभागामुळे नाविन्यपूर्ण उपायांची निर्मिती
विजेते संघ असे :
- प्रथम क्रमांक : ‘टीम अॅक्वाबाइट’ (आर.व्ही. कॉलेज, बंगळुरू) – २ लाख रुपये.
- द्वितीय : ‘टीम सुपरनोवा’ (एसआयईएस, नवी मुंबई) – १ लाख रुपये.
- उत्तेजनार्थ (प्रत्येकी ५० हजार रुपये) :
- टीम आयओटीयन्स (फ्रां.सी. रोड्रिग्स आयटी)
- टीम किलोबाईट (एनआयआयटी, राजस्थान)
- टीम हायड्रो-ऑप्स (केएलई युनिव्हर्सिटी, हुबळी)
- स्पेशल ज्यूरी अवॉर्ड : टीम गॉड-डॅम (केएलई युनिव्हर्सिटी, हुबळी) – २५ हजार रुपये










