फौजदार चावडी पोलिसांची कारवाई; गावठी पिस्तूल, चार जिवंत काडतुसे व दुचाकीसह १.१४ लाखांचा मुद्देमाल जप्त
सोलापूर, कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रस्त्यात अडवून गावठी पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणाचा फौजदार चावडी पोलिसांनी छडा लावला. याप्रकरणी एका १९ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली असून, त्याच्यासोबत असलेल्या दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींकडून एक गावठी पिस्तूल, चार जिवंत काडतुसे आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण १ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे ६.४० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी विद्यार्थी आपल्या मित्रासोबत कॉलेज परिसरातून जात होता. त्यावेळी संशयितांनी त्यांचा पाठलाग केला. फिर्यादीजवळ येऊन पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर फिर्यादीने फौजदार चावडी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यावरून भारतीय न्याय संहिता तसेच शस्त्र अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलिस निरीक्षक महादेव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने तातडीने तपास सुरू केला. घटनास्थळासह परिसरातील हॉटेल, लॉज तसेच विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तांत्रिक माहिती आणि मिळालेल्या गोपनीय माहितीद्वारे संशयितांचा माग काढण्यात आला. त्यानंतर पथकाने मुख्य आरोपीसह दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले.
तपासादरम्यान गुन्ह्यात वापरलेले एक गावठी पिस्तूल, चार जिवंत काडतुसे आणि मोटारसायकल हस्तगत करण्यात आली. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे १ लाख १४ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. मुख्य आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले, तर दोन्ही विधिसंघर्षग्रस्त बालकांना बाल न्याय मंडळासमोर हजर करण्याची प्रक्रिया करण्यात आली.पोलिसांच्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या १९ वर्षीय आरोपीविरुद्ध यापूर्वीही गुन्हा नोंद असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणात पिस्तूल नेमके कोठून आणले, ते कोणी उपलब्ध करून दिले आणि त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
ही कारवाई पोलिस आयुक्त एम. राजकुमार, पोलिस उपायुक्त (परिमंडळ) प्रीतम यादव, सहायक पोलिस आयुक्त अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक महादेव राऊत यांच्या नेतृत्वातील फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली