सोलापूर, : आषाढी वारीसाठी येणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे ठाम प्रतिपादन सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांनी केले. जिल्हा परिषद सभागृहात झालेल्या स्थायी समितीच्या सभेत आषाढी वारी २०२६ च्या नियोजनाचा आढावा घेताना ते बोलत होते.
वारकरी संप्रदायाची सेवा करणे ही जिल्हा परिषदेची जबाबदारी आणि अभिमानाची बाब असल्याचे सांगत अध्यक्ष वैद्य यांनी सर्व विभागांना समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले. यंदाच्या वारीसाठी जिल्हा परिषद प्रशासन पूर्णपणे सज्ज असून वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सभेत वारी मार्गावरील रस्त्यांची डागडुजी तातडीने पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच वाहतूक व्यवस्थापन सुरळीत राहावे यासाठी पोलीस व आरटीओ विभागाशी समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या. पालखी मार्गावर ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, फिरते पाण्याचे टँकर आणि स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले.

वारकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने पालखी मार्गावर आरोग्य तपासणी शिबिरे, प्राथमिक उपचार केंद्रे आणि २४ तास रुग्णवाहिका सेवा तैनात ठेवण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. तसेच वारकऱ्यांच्या निवारा आणि विश्रांतीसाठी तात्पुरते शेड व मंडप उभारण्यास मंजुरी देण्यात आली. यावेळी अध्यक्ष वैद्य यांनी सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून काम करावे आणि उद्भवणाऱ्या अडचणी तातडीने सोडवाव्यात, असे निर्देश दिले. दरम्यान, सभेत शासन निर्णयांची नोंद घेण्यात आली. विविध विभागांच्या विकासकामांचा आढावा घेण्यात आला तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या जमा-खर्चास मंजुरी देण्यात आली. जिल्हा ग्रामीण विकास निधीच्या प्रस्तावांना तसेच मे २०२६ मधील विषय समित्यांच्या कार्यवृत्तांनाही मान्यता देण्यात आली.











