No Result
View All Result
सोलापूर : येथील सोलापूर बार असोसिएशनच्या निवडणुकीत विधीसंकल्प पॅनेलने बाजी मारली. पॅनेलचे अध्यक्षपदाचे उमेदवार ॲड. संतोष पाटील यांनी विजय मिळवत पॅनेलचे उपाध्यक्ष (खुला व महिला गट), खजिनदार व सचिव असे पाच उमेदवार निवडून आणले. मात्र, सहसचिवपदाच्या त्यांच्या उमेदवार रेखा लगशेट्टी गोटीपामुल यांचा क्रॉस वोटिंगमुळे पराभव झाल्याचे निकालातून पाहायला मिळाले.
सोलापूर बार असोसिएशनच्या निवडणुकीसाठी एक हजार ६८४ वकील मतदार होते; पण त्यांपैकी २४६ जण मतदानासाठी आलेच नाहीत. मंगळवारी (ता. ४) जिल्हा न्यायालयातील बार असोसिएशनच्या हॉलमध्ये शांततेत मतदान पार पडले. सकाळी साडेअकरा ते दुपारी दोन या वेळेत सर्वाधिक मतदान झाले. पहिले मतदान मावळते अध्यक्ष ॲड. बाबासाहेब जाधव यांनी, तर शेवटचे मतदान मावळते सचिव ॲड. बसवराज हिंगमिरे यांनी केले. या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी चौघेजण रिंगणात होते. याशिवाय सचिव, दोन्ही उपाध्यक्ष पदांसाठी थेट लढत झाली. तर सहसचिवपदासाठी तीन महिला उमेदवार होत्या. खजिनदारपदासाठी चौघांमध्ये लढत झाली. यात ॲड. संतोषकुमार बाराचारे, ॲड. अंजली बाबरे, ॲड. नरेंद्रकुमार गावडे हे पॅनलशिवाय स्वतंत्र लढले.
मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. रियाज शेख, ॲड. बसवराज हिंगमिरे, ॲड. अविनाश बिराजदार, ॲड. संजय पवार, ॲड. प्रवीण कुलकर्णी, ॲड. विकास कुलकर्णी, ॲड. शुभम माने यांच्यासह २५ जणांवर मतमोजणीची जबाबदारी होती. रात्री पावणेएकच्या सुमारास मतमोजणी पूर्ण झाली. यंदाच्या निवडणुकीत विधीसंकल्प पॅनलने बाजी मारली. अध्यक्षपदासाठी स्वतंत्रपणे मैदानात उतरलेले ॲड. राजेंद्र फताटे यांना चौथ्यांदा पराभव सहन करावा लागला.
- निवडणुकीचा निकाल अन् नूतन पदाधिकारी
- अध्यक्ष : ॲड. संतोष पाटील (पराभूत : ॲड. एस. आर. रेशमे, ॲड. राजेंद्र फताटे, ॲड. मल्लिनाथ म्हमाणे).
- उपाध्यक्ष : ॲड. परमानंद जवळकोटे (खुला गट) (पराभूत : ॲड. परवेज ढालायत), महिला राखीवमधून ॲड. शर्मिला देशमुख (पराभूत : ॲड. उर्मिला जहागीरदार).
- सचिव : ॲड. जयप्रकाश भंडारे (पराभूत : ॲड. मंजुनाथ कक्कलमेली).
- सहसचिव : ॲड. प्रियंका गोरंटी (पराभूत : ॲड. मेघना मलपेद्दी, ॲड. रेखा लगशेट्टी गोटीपामुल).
- खजिनदार : ॲड. सिद्धाराम पाटील (पराभूत : ॲड. संतोषकुमार बाराचारे, ॲड. अंजली बाबरे, ॲड. नरेंद्रकुमार गावडे, ॲड. मंगेश कंदलगावकर).
No Result
View All Result