No Result
View All Result
सोलापूर : देशभरात साखरेच्या दरात वाढ होत असताना जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे उपलब्ध असलेल्या साखर साठ्याची प्रशासनाकडून तपासणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील कारखान्यांमधील साखर साठ्याचा आढावा घेतल्याने कारखानदारांमध्येही चर्चेला उधाण आले आहे.
जिल्ह्यातील काही कारखान्यांनी उपलब्ध साखर साठ्याची जी आकडेवारी सादर केली आहे, त्याची प्रत्यक्ष साठ्याशी पडताळणी केली जात असल्याचे सांगण्यात येते. विशेषतः कारखान्यांकडे शिल्लक असलेली साखर, मागणीच्या तुलनेत उपलब्ध साठा आणि नोंदविलेली आकडेवारी यामध्ये तफावत आहे का, याची खातरजमा करण्यावर भर देण्यात येत आहे.
काही कारखान्यांकडे साखर शिल्लक असल्याचे दिसून येत असले, तरी मागणीच्या तुलनेत पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे संबंधित विभागाच्या आकडेवारीत नमूद आहे. त्यामुळे कारखान्यांनी दाखविलेला साठा आणि प्रत्यक्ष उपलब्ध साठा यामध्ये काही फरक आहे का, याची तपासणी महत्त्वाची ठरणार आहे. दरम्यान, या तपासणीच्या पार्श्वभूमीवर साखर आयुक्त कार्यालयाकडूनही संबंधित माहिती मागविण्यात आली असल्याचे समजते. कारखान्यांकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीची शहानिशा झाल्यानंतरच साखर साठ्याचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे.
आकडेवारीतील तफावत समोर येणार का?
कारखान्यांनी सादर केलेली साखर साठ्याची माहिती आणि प्रत्यक्ष गोदामातील साठा यामध्ये तफावत आढळते का, याकडे आता लक्ष लागले आहे. तपासणीनंतर साखर साठ्याबाबतचे वास्तव समोर येण्याची शक्यता आहे.
No Result
View All Result