१३ ते १९ सप्टेंबरपर्यंत आदेश; गर्दीच्या प्रमुख मार्गांवर वाहनांना प्रवेशबंदी, पर्यायी मार्ग निश्चित
सोलापूर; गणेशोत्सव आणि गौरी-गणपतीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या मध्यवर्ती भागात होणारी गर्दी लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल केले आहेत. गणेशमूर्ती प्रतिष्ठापना तसेच पूजेच्या साहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठेत होणारी नागरिकांची गर्दी लक्षात घेऊन १३ ते १९ सप्टेंबर या कालावधीत काही प्रमुख मार्ग वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.
शहरातील मधला मारुती, टिळक चौक, कोंतम चौक, माणिक चौक आणि मंगळवार पेठ पोलिस चौकी परिसरात गणेशोत्सवाच्या काळात मोठी वर्दळ असते. त्यामुळे या भागातून वाहनांची ये-जा सुरू राहिल्यास वाहतूक कोंडीसह अपघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी वाहतूक मार्गात बदल करण्याचे आदेश दिले आहेत.
या आदेशानुसार टिळक चौक-मधला मारुती-कोंतम चौक-माणिक चौक-मंगळवार पेठ पोलिस चौकी परिसरातील मार्ग वाहनांसाठी बंद राहणार आहेत. या काळात वाहनचालकांना बाळीवेस, बीएसएनएल कार्यालय, मंगळवार पेठ पोलिस चौकी, कुंभार वेस, कोंतम चौक तसेच जुनी कसबा पोलिस चौकीकडील पर्यायी मार्गांचा वापर करता येणार आहे.
आदेश मोडल्यास कारवाई पोलिस आणि अत्यावश्यक सेवेतील वाहनांना या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे. इतर वाहनचालकांनी प्रतिबंधित मार्गावर प्रवेश करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. आदेशाचे उल्लंघन करून गर्दीच्या भागातून वाहन नेल्यास संबंधित वाहनचालकावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे