सोलापूर, दि. ७ : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ पारदर्शक, सुरळीत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्याचे काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी दिल्या आहेत. निवडणूक साहित्य वाटपाचा आराखडा अचूकपणे तयार करून २१ ऑक्टोबर रोजी रामवाडी गोडाऊन येथे तालुकास्तरावर, तर २२ ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रनिहाय साहित्य वाटप पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात पदवीधर-शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या तयारीसंदर्भात नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली.
या बैठकीत निवडणुकीच्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी लक्ष्मण कसेकर, उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख, प्रांताधिकारी सुमित शिंदे, एनआयसीचे जिल्हा सूचना अधिकारी रवी पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी ओंकार पडोळे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी देठे, तहसीलदार दिनेश पारगे, तहसीलदार सरस्वती पाटील यांच्यासह संबंधित नोडल अधिकारी उपस्थित होते.भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेतील विविध कामांसाठी जिल्हा प्रशासनाने स्वतंत्र नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. आदर्श आचारसंहिता, कायदा व सुव्यवस्था, निवडणूक खर्च नियंत्रण, मतदान केंद्र व्यवस्थापन, मतदान कर्मचारी प्रशिक्षण, वाहन व्यवस्था, निवडणूक साहित्य, मतदार यादी वितरण, मीडिया कक्ष, टपाली मतपत्रिका, मतपत्रिका छपाई व वाटप, संगणक व कम्युनिकेशन, स्ट्राँग रूम, मतमोजणी केंद्राची तयारी, आरोग्य सुविधा, भोजन व्यवस्था, स्वीप कार्यक्रम आणि वेबकास्टिंग अशा विविध जबाबदाऱ्या अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आल्या आहेत.
२१ व २२ ऑक्टोबरला साहित्य वाटप : निवडणूक साहित्य वाटपात कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. उपप्रादेशिक परिवहन विभागाने निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक वाहनांची वेळेत उपलब्धता सुनिश्चित करून स्वतंत्र वाहतूक आराखडा तयार करावा, असे निर्देश देण्यात आले. २१ ऑक्टोबर रोजी रामवाडी गोडाऊन येथे तालुकास्तरीय यंत्रणांना निवडणूक साहित्याचे वाटप केले जाणार आहे. त्यानंतर २२ ऑक्टोबर रोजी संबंधित तालुकास्तरीय यंत्रणांकडून नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रनिहाय साहित्य वितरित केले जाणार आहे.मतदान केंद्रांवर मतदार आणि निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच भोजन व्यवस्थेचेही योग्य नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
महानगरपालिका व जिल्हा परिषद प्रशासनाने स्वीप (SVEEP) कार्यक्रम प्रभावीपणे राबवून मतदारांमध्ये निवडणूक प्रक्रियेबाबत जनजागृती करण्यावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले.निवडणूक प्रक्रिया ही अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाची जबाबदारी असून, प्रत्येक अधिकाऱ्याने सोपविण्यात आलेली जबाबदारी गांभीर्याने पार पाडावी. कोणत्याही टप्प्यावर त्रुटी राहणार नाहीत, याची दक्षता घेत निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी स्पष्ट केले.
सोलापूर जिल्ह्यात एकूण १९३ मतदान केंद्रे असून त्यापैकी पदवीधरची ११७ व शिक्षकची ७६ केंद्रे आहेत. २४४ करमाळा : विधानसभा मतदार संघात पदवीधरची १० केंद्रे (क्र. १६१ ते १७०) व शिक्षकची ८ केंद्रे (क्र. ७३ ते ८०) अशी एकूण १८ केंद्रे. २४५ माढा : मध्ये पदवीधरची १३ केंद्रे (१७१ ते १८३) व शिक्षकची ९ केंद्रे (८१ ते ८९) एकूण २२ केंद्रे. २४६ बार्शी : मध्ये पदवीधरची ११ केंद्रे (१८४ ते १९४) व शिक्षकची ९ केंद्रे (९० ते ९८) एकूण २० केंद्रे. २४७ मोहोळ (SC): मध्ये पदवीधरची ११ केंद्रे (१९५ ते २०५) व शिक्षकची ७ केंद्रे (९९ ते १०५) एकूण १८ केंद्रे. २४८ सोलापूर शहर उत्तर: मध्ये पदवीधरची ८ केंद्रे (२०६ ते २१३) व शिक्षकची २ केंद्रे (१०६, १०७) एकूण १० केंद्रे. २४९ सोलापूर शहर मध्य : मध्ये पदवीधरची ४ केंद्रे (२१४ ते २१७) व शिक्षकचे १ केंद्र (१०८) एकूण ५ केंद्रे. २५० अक्कलकोट : मध्ये पदवीधरची १० केंद्रे (२१८ ते २२७) व शिक्षकची १० केंद्रे (१०९ ते ११८) एकूण २० केंद्रे. २५१ सोलापूर दक्षिण : मध्ये पदवीधरची १० केंद्रे (२२८ ते २३७) व शिक्षकची ६ केंद्रे (११९ ते १२४) एकूण १६ केंद्रे. २५२ पंढरपूर: मध्ये सर्वाधिक पदवीधरची १५ केंद्रे (२३८ ते २५२) व शिक्षकची ९ केंद्रे (१२५ ते १३३) एकूण २४ केंद्रे. २५३ सांगोला: मध्ये पदवीधरची १२ केंद्रे (२५३ ते २६४) व शिक्षकची ९ केंद्रे (१३४ ते १४२) एकूण २१ केंद्रे. २५४ माळशिरस (SC) : मध्ये पदवीधरची १३ केंद्रे (२६५ ते २७७) व शिक्षकची ६ केंद्रे (१४३ ते १४८) एकूण १९ केंद्रे.