सोलापूर, : जागतिक रक्तदाता दिनानिमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील शासकीय रक्तपेढीच्या वतीने विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. स्वैच्छिक रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत रक्तदात्यांच्या अमूल्य योगदानाचा गौरव यावेळी करण्यात आला. रुग्णालय परिसरात रक्तदान विषयक माहितीपूर्ण पोस्टर प्रदर्शन भरविण्यात आले. रक्तदानाबाबत असलेले गैरसमज, रक्तदात्यांची पात्रता, रक्तदानाची प्रक्रिया आणि रक्तदानामुळे रुग्णांचे जीव कसे वाचतात, याबाबत आकर्षक पोस्टर्सच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमाचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना त्यांनी, रक्ताची गरज कोणत्याही क्षणी उद्भवू शकते. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन केले.
या प्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ. तोडकर, विकृतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. सुनीता दंतकाळे, रक्तकेंद्र प्रमुख डॉ. सुशील सोनावणे, सोलापूर सर्जिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. प्रदीप कसबे, डॉ. प्रदीप गाडगीळ, डॉ. औदुंबर मस्के, डॉ. खरे, डॉ. शेटे, डॉ. खिस्ते, डॉ. ऐश्वर्या गवई, डॉ. शुभांगी दिलपाके यांच्यासह वैद्यकीय अधिकारी आणि रक्तपेढीतील कर्मचारी उपस्थित होते. यावेळी रक्तदानाविषयी माहितीपत्रकांचे वितरण करण्यात आले. तसेच सोलापूर सर्जिकल सोसायटीच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. याच दिवशी जिल्हा कोषागार कार्यालयातही रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.