पंढरपूर, : पंढरपूर शहरातील अनिलनगर परिसरात राहणाऱ्या २५ वर्षीय युवकाचा खून करून त्याचा मृतदेह भीमा नदीलगतच्या रेल्वे रुळांवर टाकल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली असून पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे. रोहित मधुकर कोरे (वय २५) असे मृत युवकाचे नाव आहे. मंगळवारी सकाळी भीमा नदीजवळील रेल्वे रुळांवर हात-पाय बांधलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठविण्यात आला असून प्राथमिक तपास सुरू आहे.
दरम्यान, रोहितच्या आईने या प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत. आपल्या मुलाचा पूर्वनियोजित कट रचून खून करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच, हा प्रकार अपघात किंवा आत्महत्या असल्याचा बनाव निर्माण करण्यासाठी मृतदेह रेल्वे रुळांवर टाकण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. याशिवाय, मृताचा एक पाय तोडून तो आपल्या बहिणीच्या घरावर टांगण्यात आल्याचा धक्कादायक आरोपही त्यांनी केला आहे. या प्रकरणात शेजारी राहणाऱ्या काही व्यक्तींवर संशय व्यक्त करत संबंधितांची नावे पोलिसांना दिल्याची माहिती त्यांनी दिली.
पोलिसांकडून सर्व आरोपांची पडताळणी केली जात असून घटनास्थळावरील पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि संबंधित व्यक्तींची चौकशी करण्यात येत आहे. शवविच्छेदन अहवाल आणि तपासानंतरच मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.