सोलापूर : लोणावळा-कर्जत घाट विभागात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. परिणामी मुंबईकडे जाणाऱ्या आणि मुंबईहून येणाऱ्या अनेक रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. १० जुलै) सोलापूर रेल्वे स्थानकावरून मुंबईकडे जाणारी हायस्पीड ‘वंदे भारत एक्सप्रेस’ नियोजितप्रमाणे रवाना झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

घाट विभागातील रेल्वे मार्गावर सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष दक्षता घेण्यात येत असून, काही ठिकाणी गाड्यांचा वेग कमी करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक गाड्या विलंबाने धावत असल्याचे रेल्वे विभागाकडून सांगण्यात आले. रेल्वे प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून, मार्गावरील अडथळे दूर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना दिल्या जात आहेत. सोलापूरहून सुटणारी इंद्रायणी एक्सप्रेस सायंकाळी ५.३० वाजता रवाना होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. उद्यान एक्सप्रेस पुण्यापर्यंत धावली असून, सिद्धेश्वर एक्सप्रेस आणि हुतात्मा एक्सप्रेस या गाड्याही सोलापूरहून नियोजितप्रमाणे धावणार असल्याचे रेल्वे विभागाने स्पष्ट केले.


दरम्यान, घाट विभागातील प्रतिकूल परिस्थितीमुळे काही गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून, प्रवाशांनी प्रवासापूर्वी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा हेल्पलाइनवर संपर्क साधून अद्ययावत माहिती घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोलापूर रेल्वे स्थानकावरही प्रवाशांना आवश्यक माहिती उपलब्ध करून देण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. रेल्वे विभागाने ९ जुलै रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, सोलापूर मार्गावरील मुंबईकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या चार महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्या १० जुलै ते १७ जुलै या कालावधीत पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. या गाड्या रद्द झाल्यामुळे मुंबई, हैदराबाद आणि चेन्नई मार्गावरील प्रवाशांना पर्यायी प्रवास व्यवस्था करावी लागणार आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांनी संयम बाळगून अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन रेल्वे प्रश्नासना कडून आले आहे.

- चार प्रमुख एक्सप्रेस १७ जुलैपर्यंत रद्द
- गाडी क्र. २२७३१ : हैदराबाद – मुंबई एक्सप्रेस
- गाडी क्र. २२७३२ : मुंबई – हैदराबाद एक्सप्रेस
- गाडी क्र. २२१५७ : मुंबई – चेन्नई एक्सप्रेस
- गाडी क्र. २२१५८ : चेन्नई – मुंबई एक्सप्रेस











