रस्त्याला वाट दिल्याशिवाय उठणार नाही’ — रुबी नगरमध्ये नागरिक आक्रमक; खासदार प्रणिती शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष
सोलापूर : विजापूर रोड परिसरातील रुबी नगर येथील जागेवरून गणेश बिल्डर आणि स्थानिक नागरिकांमधील वाद पुन्हा एकदा पेटला आहे. काही दिवसांपूर्वी हा वाद काही काळ शांत झाला होता; मात्र रस्त्याच्या वाटेच्या प्रश्नावरून पुन्हा वातावरण तापले आहे.रुबी नगर येथील सदर जागा एका उद्योजकाच्या मालकीची असल्याचे कळून येत आहे. या जागेतील रस्त्याच्या वाटेवरून नागरिक आणि संबंधितांकडून आक्षेप नोंदविला जात असून, हा प्रश्न न्यायालयीन प्रक्रियेशी संबंधित असल्याचेही सांगण्यात येत आहे.
“जोपर्यंत रस्त्याला वाट मिळत नाही, तोपर्यंत आम्ही येथून उठणार नाही,” अशी ठाम भूमिका नागरिकांनी घेतली आहे. रस्त्याचा मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी करत नागरिकांनी आंदोलनाची भूमिका घेतल्याने या प्रकरणाला पुन्हा वेगळे वळण मिळाले आहे.दरम्यान, या प्रश्नाकडे खासदार प्रणिती शिंदे यांनी लक्ष देऊन नागरिकांना रस्त्याची वाट मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे. त्यामुळे रुबी नगरमधील हा वाद पुन्हा ऐरणीवर आला असून, प्रशासन आणि संबंधितांकडून यावर काय तोडगा काढला जातो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.न्यायालयीन प्रकरणाशी संबंधित असल्याने सदर जागेचा मालकी हक्क व रस्त्याच्या वाटेबाबतचा अंतिम निर्णय अधिकृत कागदपत्रे आणि न्यायालयीन आदेशांच्या आधारेच होणे अपेक्षित आहे.