बाल न्याय मंडळातून बाहेर पडलेल्या युवकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा; करिअर, रोजगारासह सायबर सुरक्षेचे धडे
सोलापूर : बाल न्याय मंडळाच्या प्रक्रियेतून बाहेर पडलेल्या युवकांना भूतकाळातील अनुभव मागे सोडून आत्मविश्वासाने नवे भविष्य घडविण्याची प्रेरणा देण्यासाठी विशेष मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, बाल न्याय मंडळ, जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि कॅटलिस्ट्स फॉर सोशल ॲक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने १३ ऑगस्ट रोजी जिल्हा परिविक्षा व पश्चात काळजी संघटनेच्या निरीक्षण गृहात ही एकदिवसीय जनजागृती कार्यशाळा पार पडली.कार्यशाळेत सायबर सुरक्षा, करिअर व व्यवसाय, कौशल्यविकास, रोजगाराच्या संधी, व्यसनमुक्ती, बालकांशी संबंधित कायदे, बाल न्याय अधिनियम २०१५ तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा २०१२ या विषयांवर युवकांना मार्गदर्शन करण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी नितीन थोरात यांनी ‘हर घर तिरंगा’ अभियानाची माहिती देत राष्ट्रध्वजाचा सन्मान आणि देशभक्तीची भावना जोपासण्याचे आवाहन केले. यावेळी युवकांना ‘हर घर तिरंगा’ची प्रतिज्ञाही देण्यात आली.सायबर सुरक्षा विभागाचे अविनाश पाटील व प्रांजली काळे यांनी ऑनलाइन फसवणूक, सायबर गुन्हे आणि डिजिटल माध्यमांचा सुरक्षित वापर याबाबत मार्गदर्शन केले.
कॅटलिस्ट्स फॉर सोशल ॲक्शनचे लोकेशन प्रमुख अतुल भालेराव यांनी शिक्षण, कौशल्यविकास, रोजगार व व्यवसायाच्या विविध संधींची माहिती दिली.बाल न्याय मंडळाच्या अध्यक्षा न्या. अश्विनी बिराजदार यांनी युवकांशी मुक्त संवाद साधत त्यांच्या हक्क, जबाबदाऱ्या आणि सकारात्मक विचारसरणीचे महत्त्व समजावून सांगितले. बाल न्याय मंडळाच्या सदस्या प्रज्ञा खेंदाड यांनी बालकांशी संबंधित कायद्यांवर, तर बालकल्याण समितीचे अध्यक्ष समीर सय्यद यांनी बाल न्याय अधिनियमाबाबत मार्गदर्शन केले. सदस्या सुवर्णा कोकरे यांनी बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याची माहिती दिली.सारथी यूथ फाउंडेशनचे सचिव रामचंद्र वाघमारे यांनी व्यसनांचे दुष्परिणाम सांगत सकारात्मक जीवनशैलीचा अंगीकार करण्याचे आवाहन केले.

यावेळी युवकांसोबत स्वतंत्र संवाद साधून त्यांच्या वैयक्तिक अडचणी, शिक्षण, रोजगार, कौशल्यविकास आणि भविष्यातील योजनांची माहिती घेण्यात आली.कार्यशाळेला जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अविनाश मगर, बाल न्याय मंडळाच्या सदस्या गीता तळकोकूळ, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी नितीन थोरात यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते. आयोजन व समन्वय जिल्हा महिला व बाल विकास विभाग, बाल न्याय मंडळ व जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या कायदा तथा परिविक्षा अधिकारी अॅड. सारिका हुक्केरी तसेच कॅटलिस्ट्स फॉर सोशल ॲक्शनचे अभय जगताप यांनी केला.











